करोनामुक्त सातारा शहरात पुन्हा शिरकाव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 01 : सातारा शहर परिसरात स्थानिक कोणाही  करोना   बाधित नाही. मात्र, बाहेरुन आलेल्या नागरिकांमुळे कोरोना साताऱयात घुसला होता. त्यानंतर त्यावर मात करत शहर  करोना  मुक्तीचा निश्वास टाकत असताना  शहरातील समर्थ मंदिर परिसरातील बालाजी अपार्टमेंटमध्ये रहात असलेला मात्र सध्या रायगाव येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये असलेल्या एकजणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अपार्टमेंट कंटेन्मेंट झोन करण्यात आला.

सातारा शहरात प्रतापगंज पेठ, गेंडामाळ, सदरबझार, गार्डन सिटीमधील बाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त होवून घरी गेले आहेत. तर शहरातील जिल्हा कारागृहात आढळून आलेले कैदीही  करोना  मुक्त होवून घरी गेले असल्याने शहर  करोना  मुक्त झाले होते. मात्र आता समर्थ मंदिर सारख्या गजबजलेल्या परिसरात असलेल्या बालाजी अपार्टमेंटमधील एकजणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली.

साताऱ्यातील ही व्यक्ती त्याच्या नात्यातील बेलावडे, ता. जावली येथील  करोना   बाधिताच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आला होता. बेलावडे येथील एक गृहस्थ दि. 25 मे रोजी नवी मुंबईहून आले. त्यांना पॅरॉलिसिसचा त्रास होता. त्यामुळे उपचारासाठी साताऱ्यातील साईअमृत हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ते नात्याने सासरे असल्याने बालाजी अपार्टमेंटमधील व्यक्ती त्यांच्यासाठी धावपळ करत होती. सासऱ्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्कारास साताऱ्यातील पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती उपस्थित होती.

दरम्यान, बेलावडेच्या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांचा स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्यात ते सासरे करोना बाधित असल्याचे समोर आले. त्यामुळे साताऱ्यातील जावयासह त्याचे मेव्हणे व इतर अशा 17 जणांना दि. 26 रोजी पासून हाय रिस्क कॉन्टॅक्टमुळे रायगाव, ता. जावली येथील क्वॉरंटाईंन सेंटरमध्ये ठेवलेले होते. यामध्ये साताऱ्यातील जावई असलेल्या व्यक्तीच्या घशातील स्वाबचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल आला असून त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. ही बाब कळताच पालिका प्रशासनाने तातडीने उपाय योजना सुरु करत बालाजी अपार्टमेंट परिसर सील केला आहे. सासऱ्याच्या संपर्कात आल्याने जावई  करोना बाधित झाले आहेत. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने सर्व्हे सुरु केला आहे. अपार्टमेंट व परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली असून संबंधित व्यक्तीच्या हायरिस्क व लो रिस्क कॉन्टॅक्टची माहिती घेण्याचे काम सुरु  असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!