दैनिक स्थैर्य । दि. २२ ऑगस्ट २०२२ । मुंबई । भारतातील अग्रगण्य डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी आणि क्युआर व मोबाइल पेमेंटची प्रणेता पेटीएम ब्रँडची मालकी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडची नुकतीच २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. कंपनीची शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर ही पहिली वार्षिक सभा झाली आहे. या सभेत विजय शेखर शर्मा यांच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून फेरनियुक्तीसह सात ठराव ९४ टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी संमत करण्यात आले.
कंपनीच्या भागधारकांनी विजय शेखर शर्मा यांची कंपनीचे ‘व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून पुन्हा पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्याच्या ठरावाच्या बाजूने ९९.६७ टक्के मतदान केले. त्यांना गुंतवणूकदारांचा मिळालेला जवळजवळ १०० टक्के उत्स्फूर्त पाठिंबा कंपनीच्या नेतृत्वावरील विश्वास प्रतिबिंबित करतो. कंपनीच्या प्रगतीबाबत त्यांना विश्वास असल्याचे यावरून स्पष्ट होते. यापूर्वी मे २०२२ मध्ये, ‘वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड’च्या संचालक मंडळाने विजय शेखर शर्मा यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली होती.
भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने फेब्रुवारी २०२२मध्ये, भारतीय कंपन्यांसाठी स्वतंत्र अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असणे ऐच्छिक केले होते. बहुतेक निफ्टी ५० कंपन्यांमध्ये, व्यवस्थापकीय संचालकाची नियुक्ती नॉन-रोटेशनल आधारावर केली जाते.
शर्मा यांच्या वेतनाबाबतच्या ठरावाला ९४.४८ टक्के मते मिळाली. कंपनीच्या इतर सर्व कर्मचार्यांना लागू असलेल्या पॉलिसी आणि नियमांनुसारच वेतनाबाबत निर्णय घेण्यात आला. कोणत्याही वार्षिक वाढीशिवाय पुढील तीन वर्षांसाठी त्यांचे वेतन निश्चित करण्यात आले आहे. सहा एप्रिल २०२२ रोजी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात, शर्मा यांनी लोकांना कळवले होते, की त्यांचे ईएसओपीज तेव्हाच असतील जेव्हा कंपनीचे बाजारमूल्य आयपीओ पातळी ओलांडेल आणि त्यावर सातत्य राखेल. ‘ईएसओपीज’ आयपीओपूर्वी सर्व कायद्यांचे पालन करून आणि सर्व आवश्यक मंजुरीसह भागधारकांनीही मंजूर केले होते.
भागधारकांनी रविचंद्र अदुसुमल्ली यांची संचालक मंडळावर पुनर्नियुक्ती आणि मधुर देवरा यांची कार्यकारी संचालक, अध्यक्ष आणि कंपनीचे समूह मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे ठरावही संमत केले. त्यांचा मोबदला, धर्मादाय आणि इतर निधींमध्ये कंपनीचे योगदान यालाही यावेळी मान्यता देण्यात आली. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या लेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकालाला मंजुरी देण्यात आली. मधुर देवरा यांच्या नियुक्तीच्या ठरावाला ९९.८२ टक्के मते मिळाली. तर त्यांच्या मानधनाच्या ठरावाच्या बाजूने ९४.५३ टक्के मते मिळाली. मधुर देवरा २०१६ मध्ये कंपनीत सामील झाले. बडे गुंतवणूकदार कंपनीत आणण्यात आणि कंपनीच्या प्रगतीच्या योजनांना आकार देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.