दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२२ । सातारा । रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल आप्पासाहेब पाटील यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ७७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या पुरस्काराचे वितरण मुंबई विद्यापीठाच्या कोन्होकेशन हॉलमध्ये दि ८ जुलै 2022 रोजी दुपारी ४.०० वा. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम श्री. भगतसिंग कोश्यारीजी यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या असामान्य कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. डॉ. अनिल पाटील यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील सर्वोच्च ज्ञान मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. संगणक शिक्षण, स्पर्धा परीक्षा, रयत विज्ञान परिषद, कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रम यासारख्या विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे
त्याचबरोबर covid-19 च्या कालखंडात रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन अध्यापनाची प्रक्रिया राबवून अत्यंत उल्लेखनीय असे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या दि. ८ जुलै २०२२ रोजी आयोजित केलेल्या वर्धापन दिनी महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारीजी यांच्या शुभहस्ते मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रदान हॉलमध्ये दि. ८ जुलै २०२२ रोजी दुपारी ४.०० वा. सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे एका अर्थाने संस्थेचाच गौरव आहे. अशी भावना डॉ. अनिल पाटील यांनी व्यक्त केली.