
दैनिक स्थैर्य । 11 एप्रिल 2025। फलटण । रयत शिक्षण संस्थेमधील प्रत्येक सेवक ही माझी संस्था म्हणून काम करतो. त्यामुळेच रयत शिक्षण संस्था आज महाराष्ट्रासाठी दिशादर्शक असून रयत सेवक ही महाराष्ट्राची संपत्ती आहे, असे प्रतिपादन माणदेशी साहित्यिक व रयतसेवक ताराचंद्र आवळे यांनी केले.
पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयातील आण्णा शिवाजी पवार यांच्या सेवापूर्ती समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी डॉ. दीपिका लेंभे होत्या. यावेळी स्कुल कमिटी सदस्य सुरेशराव साळुंखे, अशोक लेंभे, रणजित लेंभे, अमोल निकम, विकास साळुंखे, रयत शिक्षण संस्था उच्च शिक्षण विभागाचे प्रकाश पाटील, ऑडिट विभागाचे दत्तात्रय भोसले, रयत सेवक संघाचे सचिव अनिल खरात, डी.के. महाजन, प्रभाकर काकडे, बाबुराव काकडे, रयत सेवक चंद्रकांत यादव, शंकर जाधव, देवानंद गोंजारी, नितीन टोणपे, मुख्याध्यापक एन. एस. साळुंखे, पर्यवेक्षक बी. के. घार्गे यांची आदी मान्यवर उपस्थित होते.
ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील व सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या त्यागातून संस्था साकारली. आज रयतेचा वाढलेला वटवृक्ष पाहिल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांची दूरदृष्टी किती महान होती हे लक्षात येते. रयत सेवकाचा विश्वास मन, मेंदू, मनगट व स्वावलंबावरती असल्यामुळे विद्यार्थी हे बहुआयामी तयार झालेले दिसतात. याचे श्रेय शिक्षकांच्याकडे जाते.
महाबळेश्वरवाडी, ता. माण या दुष्काळी भागातील अण्णा पवार यांचा प्रवास हा पालातून महालाकडे झाला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भांडी विकणे, भंगार गोळा करणे, खेकडे, मासे धरणे अशाप्रकारचे काम त्यांनी केले. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेतून आयुष्याला आकार घेतला. शिपाई ते शिक्षक हा प्रवास त्यांचा थक्क करणार आहे. कर्मवीर अण्णांच्या विचाराचा पाईक व सच्चा रयत सेवक म्हणून ओळखले जाते. कर्मवीर अण्णांच्या संस्थेने अनेक माणसे घडविलेली त्यापैकी एक म्हणजे आण्णा शिवाजी पवार.
यावेळी डॉ. सौ. दीपिका लेंभे, विकास साळुंखे, अनिल खरात, पी. बी. ननावरे, मानसी भंडलकर अस्मिता नावडकर यांनी मनोगत व्यक्त केले.
आण्णा पवार म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेबद्दल नेहमीच माझ्या मनात कृतज्ञता असेल. अखेरच्या श्वासापर्यंत रयत सेवक म्हणून निष्ठा असेल. रयत शिक्षण संस्थेने कमवा आणि शिका योजनेतून शिक्षण झाले. मला माणूस म्हणून घडवले याचा मला सार्थ अभिमान आहे. यावेळी आण्णा पवार यांनी शाळेला अन्न शिजविण्यासाठी भांडी भेट दिली.
गौरवसमारंभानिमित्त आण्णा पवार यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपशिक्षक सी. बी. साळुंखे यांनी मानपत्राचे वाचन केले. मुख्याध्यापक एन. एस. साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. सौ. यु व्ही. नाचण यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ग्रामस्थ, रयत सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.