
दैनिक स्थैर्य । 27 मार्च 2025। सातारा । रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ वहिनी यांच्या 95 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या स्थानिक शाखांच्यावतीने शनिवार दिनांक 29 मार्च 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता धनिणीच्या बागेतील श्री. छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस शाखा नंबर 1 येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
हा कार्यक्रम चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून रयत संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील तसेच विविध अधिकार मंडळातील सदस्य, पदाधिकारी, अधिकारी, संस्थेचे थोर देणगीदार, सातारा येथील रयतच्या शैक्षणिक संकुलातील सर्व शाखाप्रमुख, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
सौ. लक्ष्मीबाई उर्फ रयत माऊली यांनी वसतिगृहातील मुलांना आईची माया, प्रेम देऊन त्यांचे पालन पोषण केले. कित्येकदा त्यांनी अंगावरील सोन्याचे दागिने गहाण ठेवून, कधी दागिने विकून वसतिगृहातील मुलांना सांभाळले.
आपल्या पोटच्या मुलापेक्षाही जास्त प्रेम त्यांनी वसतिगृहातील मुलांना दिले. गुढी पाडव्याच्या आदल्यादिवशी त्यांचे निधन झाले. जशी त्यांना मृत्युची चाहूल लागली, त्यावेळी त्यांनी कर्मवीरांना सांगितले की माझे बरे वाईट झाले तरी तुम्ही मुलांना पाडव्याच्या दिवशी गोड धोड जेवण द्या. स्वतःचा जीव संकटात असताना, रयतेच्या लेकरांना आपलेपण त्यांनी दिले. रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी कर्मवीरांचे विशाल ध्येय जाणून, धैर्याने, सुख-दुःखात साथ देऊन हे वसतिगृह चालविले. छत्रपती शाहू बोर्डिंग हीच खरी रयत शिक्षण संस्थेची गंगोत्री आहे.
सौ. लक्ष्मीबाई पाटील उर्फ वहिनी यांच्या समर्पित कार्याचे स्मरण करून त्यातून प्रेरणा घेण्यासाठी दरवर्षी पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले आहे.