
झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा । या उक्तीप्रमाणे काही लोक असे असतात की त्यांच्याशी तुलना करण्याजोगे भूतकाळात किंवा वर्तमानकाळात आढळत नाहीत. एवढेच नव्हे तर पुढेही होण्याची आशा नसते. पत्रकारिता क्षेत्रातील अशा अद्वितीय व्यक्तीमत्त्वांमध्ये फलटण, जि. सातारा येथील ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ हे निश्चितपणे येतात. सुमारे 57 वर्षे सलग पत्रकारिता क्षेत्रात काम करणार्या रविंद्र बेडकिहाळ यांचा आज 22 एप्रिल रोजी 81 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांचे कार्य संक्षिप्त स्वरुपात सांगणारा हा विशेष लेख…..
पत्रकारितेला सुरुवात
सन 1968 पासून श्री. रविंद्र बेडकिहाळ यांनी फलटण येथून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. दैनिक संध्या, केसरी, तरुण भारत, नवशक्ती, लोकसत्ता अशा नामांकित वृत्तपत्रातून वार्तांकनाचे काम करत असतानाच सन 1980 साली त्यांनी स्वत:चे ‘लोकजागर’ हे वृत्तपत्र सुरु केले. फलटण सारख्या निमशहरी भागातून सुरु झालेले हे वृत्तपत्र आज गेली 46 वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. नियत वयोमानानुसार रविंद्र बेडकिहाळ यांनी ‘लोकजागर’ च्या मालकी व संपादक या जबाबदारीतून निवृत्ती घेतली असली तरी हाडाच्या पत्रकाराची लेखणी कधीही निवृत्त होऊ शकत नाही; हे त्यांच्या सातत्याने सुरु असणार्या वैविध्यपूर्ण लिखाणातून सिद्ध होते. वयाच्या 81 व्या वर्षीही ‘लोकजागर’ सह अन्य वृत्तपत्रांमधून प्रकाशित होणारे त्यांचे प्रासंगिक लेखन अद्वितीयच मानावे लागेल.
संघटनात्मक कार्य
शहर, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर विविध माध्यमांतून पत्रकारिता करणारे अनेक मान्यवर आपण पाहत असतो. समाजासाठी नियमित बातमीदारी, लिखाण करताना दुसरीकडे पत्रकारांसाठीही कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या पाहिजेत; या उद्देशाने रविंद्र बेडकिहाळ यांनी अव्याहतपणे केलेले पत्रकारांसाठीचे संघटनात्मक कामही अद्वितीय असेच आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सन 1970 पासून त्यांनी या संघटनात्मक कामाची सुरुवात केली. त्याचबरोबर वृत्तपत्र संपादकांच्या प्रश्नांवर सन 1972 पासून बृहन्महाराष्ट्र जिल्हा वृत्तपत्र संपादक संघटना व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ या राज्यपातळीवरील संघटनांमधून ते कार्यरत झाले. पण मुळात ‘होय जी’ ही वृत्ती नसल्याने व स्वत:ची स्वतंत्र विचारसरणी, निर्णयक्षमता असल्याने त्यांनी सन 1987 मध्ये महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी ही स्वतंत्र विश्वस्त संस्था स्थापन केली. या संस्थेचे कार्य राज्यपातळीवर नेले. कोणत्याही राज्यपातळीवरील संस्था वा संघटनेशी समांतर कार्य न केल्याने महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी ही संस्था रविंद्र बेडकिहाळ यांच्या नेतृत्त्वात वैशिष्ठ्यपूर्ण ठरते. या संस्थेने शासनाच्या वा अन्य पत्रकार संघटनांच्या आगोदर केलेल्या अनेक कामांमुळे रविंद्र बेडकिहाळ यांचे हेही कार्य अद्वितीयच आहे. या संस्थेने सर्वात प्रथम आपद्ग्रस्त पत्रकारांना व त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत दिली. याच संस्थेने राज्यातील पत्रकारांना प्रोत्साहन म्हणून मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण सुरु केले. या संस्थेने व्यापक स्वरुपात 6 जानेवारी हा ‘दर्पण’ शुभारंभ दिन ‘राज्यस्तरीय मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्याची सुरुवात केली. याच संस्थेने राज्यातील पहिले बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक, त्यांच्या जन्मगावी पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे उभारले.
लघु वृत्तपत्रांचे संकटमोचक
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या माध्यमातून रविंद्र बेडकिहाळ अनेक कारणांनी लघु वृत्तपत्रांचे संकटमोचक ठरतात. लघु वृत्तपत्रांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी, शासनदरबारी या वृत्तपत्रांची योग्य दखल घेण्यासाठी, या वृत्तपत्रांचे संपादक, वार्ताहार यांना शासनाच्या सोयी – सवलती मिळण्यासाठी रविंद्र बेडकिहाळ यांचा याही वयात सुरु असलेला पाठपुरावा अद्वितीयच मानावा लागेल. लघु वृत्तपत्रांच्या प्रश्नांवर सातत्याने पत्रव्यवहार, निवेदन, भेटी – गाठी, बैठका हे सत्र त्यांच्याकडून कायम सुरुच असते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना, वृत्तपत्रांना मिळालेली जाहिरात दरवाढ, वृत्तपत्र पडताळणीतील जाचक अटींमधील शिथीलता, विशेष मोहिमांच्या जाहिरातींचे वितरण, दर्शनी जाहिरातींच्या संख्येत झालेली वाढ या अशा अनेक यशस्वी निर्णयांमागे रविंद्र बेडकिहाळ यांचा पाठपुरावा आणि संघर्ष अतिशय कारणीभूत आहे.
एकाचवेळी अनेक आघाड्या
पत्रकारिता क्षेत्र केंद्रस्थांनी ठेवून शिक्षण, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर एकाचवेळी लढणारे व्यक्तीमत्त्व म्हणूनही रविंद्र बेडकिहाळ अद्वितीय ठरतात. फलटण येथून सुरु असलेली महात्मा एज्युकेशन सोसायटी, भारती विद्यापीठ या देशातील अग्रमानांकित विद्यापीठाचे नियामक मंडळ सदस्य, राज्यातील ऐतिहासिक अशा रयत शिक्षण संस्थेचे सदस्य म्हणून ते शिक्षण क्षेत्रात आजही योगदान देत आहेत. साहित्य क्षेत्रातील नामांकित आणि सुमारे 119 वर्षांचा इतिहास असणारी महाराष्ट्र साहित्य परिषद; या परिषदेचे ते सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून सातारा जिल्ह्यातील साहित्य चळवळीला चालना आणि नवी दिशा देत आहेत. परिषदेच्या फलटण शाखेच्यामाधून सुरु असलेले यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन व अन्य साहित्यिक – सांस्कृतिक उपक्रम राज्यातील साहित्य वर्तृळात अतिशय प्रसिद्ध आहेत. लोकजागर प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही रविंद्र बेडकिहाळ सातत्याने आपले सामाजिक योगदान देत असतात.
शेवटचा मुद्दा…
रविंद्र बेडकिहाळ हे नाव पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या उंचीवर आहे. कोणत्याही मोठ्या वृत्तपत्रात गलेलठ्ठ पगाराची त्यांनी नोकरी केली नाही; कुठल्याही बड्या हस्तीचे मांडलिकत्व स्विकारले नाही; पत्रकारितेला ढाल करुन गैरमार्गाने सुबत्ता मिळवली नाही; तरीही ते यशस्वी कसे झाले? या प्रश्नाच्या मागे गेल्यावर हे लक्षात येते की; हाती घेतलेले काम त्यांनी अत्यंत निष्ठेने केले आहे. शरद पवार, डॉ.पतंगराव कदम यांच्याशी जुळलेला कौटुंबिक स्नेह त्यांनी प्रामाणिकपणे जोपासला आणि त्याचा उपयोग सामाजिक योगदानात केला. कुणी द्वेष केला, निंदा – नालस्ती केली, वैयक्तीक आरोप केले तरीही त्याकडे लक्ष न देता जे येतील त्यांच्या सोबत; जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय या सूत्राप्रमाणे ते आपले काम करत राहिले, करत आहेत आणि करत राहणार आहेत. त्यांचा बँक बॅलन्स कमी दिसेल पण त्यांच्या कामाचा बॅलन्स आणि पुढे करावयाच्या कामाचे अंदाजपत्रक अतिशय सक्षम आहे. पत्रकारितेत इतके लक्षणीय विविधांगी कार्य करणार्या अशा या अद्वितीय व्यक्तीमत्त्वास 81 व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याला सलाम !
– रोहित वाकडे,
संपादक लोकजागर, फलटण.