रविंद्र बेडकिहाळ यांना ‘प्रेरणा पुरस्कार’ जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२२ । फलटण । ऑल जर्नालिस्ट अ‍ॅण्ड फ्रेन्डस् सर्कल महाराष्ट्र या पत्रकार मित्र संघटनेच्यावतीने देण्यात येणारा ‘प्रेरणा पुरस्कार 2022’ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण मंगळवार, दि.27 डिसेंबर 2022 रोजी कोल्हापूर येथे आयोजित 17 व्या पत्रकार संमेलनामध्ये समारंभपूर्वक होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय पत्रकार जेतीन देसाई यांच्या हस्ते होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माहिती व जनसंपर्क उपसंचालक डॉ.संभाजी खरात हे उपस्थित राहणार आहेत.
स्वागताध्यक्ष म्हणून जे.एफ. सी. केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी, प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते आरते तसेच ब्लॉगर पत्रकार मच्छिंद्र येणापुरे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे स्वागत एजेएफसी विश्‍वस्त तथा जेष्ठ पत्रकार अतुल फोन कळसे हे करणार असून प्रस्तावना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल हे करणार आहेत.

रवींद्र बेडकीहाळ गेल्या 54 वर्षांपासून मराठी वृत्तपत्रसृष्टीत विविध राज्यस्तरीय वृत्तपत्रे व पत्रकारितेतील संस्थात्मक कार्यात कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील गरजू पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या आपद्ग्रस्त काळात तातडीने वैद्यकीय आर्थिक मदत आणि मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरणकार्य यासाठी त्यांनी 6 जानेवारी 1987 साली महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या स्वायत्त विश्‍वस्त संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 350 हून जास्त गरजू पत्रकार व त्यांचे कुटुंबीयांना मदत, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे त्यांच्या पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) या जन्मगावी पहिल्या स्मारकाची उभारणी, राज्यातील महसूल विभागवार प्रत्येकी एक याप्रमाणे राज्यात दरवर्षी 6जानेवारी पत्रकार दिनानिमित्त 8 पत्रकारांना दर्पण पुरस्कार वितरण, आत्तापर्यंत 250 होऊन जास्त पत्रकार या पुरस्काराने सन्मानित, राज्यात विविध ठिकाणी पत्रकारांसाठी कार्यशाळा, ‘दर्पण’करांना केंद्र सरकार तर्फे आदरांजली म्हणून खास टपाल लिफाफ्याचे टपाल खात्यातर्फे प्रकाशन तसेच राज्य शासनातर्फे ‘दर्पण’ करांना अभिवादन म्हणून दरवर्षी 6 जानेवारी पत्रकार दिना दिवशी राज्यातील सर्व वृत्तपत्रांना विशेष अभिवादनच्या जाहिरातीचे वितरण, शासनातर्फे दरवर्षी बाळशास्त्री जांभेकर जयंती दिवशी 20 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातून अभिवादन, मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयात जांभेकर यांच्या तैलचित्राचे अनावरण,ज्येष्ठ निवृत्त संपादक पत्रकार यांना आयुष्याच्या संध्याकाळी दरमहा 11,000/- रुपये सन्मानाने मिळण्यासाठी राज्यशासनातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना सुरू करण्यात यशस्वी पुढाकार, जांभेकर यांचे राज्याच्या शैक्षणिक कार्यातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नावाने पहिले शैक्षणिक स्मारक म्हणून फलटण जिल्हा सातारा येथे 1997 पासून आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय सुरू, पत्रकारांसाठी आरोग्य सुविधा इत्यादी अनेक विधायक उपक्रमांसाठी बेडकिहाळ सातत्याने आजही वयाच्या 78 व्या वर्षी कार्यरत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जेष्ठ कार्यकारी मंडळ सदस्य व सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत असून या माध्यमातून सातारा सांगली जिल्ह्यात त्यांनी नव्याने म.सा.प शाखा सुरु केल्या आहेत. फलटण येथे गेल्या दहा वर्षापासून यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. बेडकिहाळ यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना ‘प्रेरणा पुरस्कार 2022‘ ने सन्मानित करण्यात येणार असल्याचे संयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.

दरम्यान सदर पुरस्काराबद्दल बेडकिहाळ यांचे पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय यासह विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!