दैनिक स्थैर्य । दि. ०८ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना करोना संकटात स्थलांतरीत मजुरांच्या पलायनाचा मुद्दा उपस्थित केला. यूपी आणि बिहारच्या मजुरांना काँग्रेसने उकसवले. मुंबईवरील बोजा कमी करण्यासाठी त्यांना काँग्रेसने रेल्वेची मोफत तिकिटं दिली. यामुळे देशात करोनाचा संसर्ग वाढला. काँग्रेसने हे मोठे पाप केले आहे. महाराष्ट्र सरकारने जबाबदारी झटकली, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केला. यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
पंतप्रधान मोदींनी केलेल्या आरोपांना सरकारमधील सत्ताधारी पक्ष उत्तर देतील. सरकारवर झालेल्या कोणत्याही आरोपांना कायम मी का उत्तर द्यावं, असं नाही. सरकारमधील सत्ताधारीही उत्तर देतील. मीच का उत्तर देऊ. हा राज्य सरकारचा मुद्दा आहे. ते बोलतील यावर, असं संजय राऊत म्हणाले.
हा महाराष्ट्रातील साडेअकरा कोटी जनतेचा, राज्य सरकारचा आणि करोना संकटात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा अपमान आहे. विधानसभा निवडणुका पाहून हा ठेपका ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. हा महाराष्ट्र सरकारवर हा ठपका आहे. यामुळे सरकारमधील लोकांनी यावर बोलावं. फक्त मी बोलण्याचा ठेका घेतला आहे का? स्थलांतरी मजुरांना सोडणाऱ्या सोनू सूदचा सत्कार कोणी केला? महाराष्ट्र सरकारला जमत नाही मजुरांना पाठवणं, हे सोनू सूद करत होता, हे दाखवण्याचा प्रयत्न कोणी केला? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
किरीट सोमय्यावर झालेल्या हल्ल्यावर संजय राऊत बोलले. सोमवय्यांवर झालेल्या प्रकरणी कायद्यानुसार कारवाई होईल. आपल्या देशात कायदा आहे. त्यांना वाटत असेल तर त्यांनी आंतरराष्ट्री न्यायालयात जावं. उगाच आरोपांची राळ उठवू नये. जीवघेणा हल्ला झाला असेल, तर कायद्यानुसार कारवाई होईल. आम्ही काय कोर्टाचे मालक आहोत का? कोर्टाचे मालक कोण आहेत? हे तुम्हाला माहिती आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला.