दैनिक स्थैर्य । दि.०८ एप्रिल २०२२ । मुंबई । अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईत फ्लॅट, जमीन जप्त झाल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा तोल गेला आहे. यामुळेच ते किरीट सोमय्या यांच्यावर खोटेनाटे आरोप करीत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी केले.
राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांचा संप व्यवस्थित हाताळता न आल्यानेच कामगारांच्या संयमाचा बांध सुटला, असेही श्री. राणे यांनी नमूद केले. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यावेळी उपस्थित होते.
श्री.राणे यांनी सांगितले की, खा.राऊत यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने केलेली कारवाई कायद्यानुसारच आहे. राऊत यांनी आपल्या मालमत्तेबाबत अंमलबजावणी संचालनालयाकडे खुलासा करावा. त्यांच्या ज्ञात उत्पन्नातून एवढी मालमत्ता कशी खरेदी केली याचा खुलासा करण्याऐवजी खा.राऊत हे किरीट सोमय्या यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत.
किरीट सोमय्या यांच्यामागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभा आहे. खा.राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करणे थांबवावे असेही श्री.राणे यांनी सांगितले.
श्री.राणे यांनी यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.ते म्हणाले की, सध्या राज्य मुख्यमंत्र्यांविनाच चालू आहे, अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री राज्य सरकारच्या कारभारात लक्ष घालत नसल्याने एसटी संप, वीज टंचाई असे प्रश्न चिघळले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना राज्यकर्त्यांकडून धमक्या दिल्या गेल्या. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार न केल्यानेच कामगार संतप्त होऊन रस्त्यावर उतरले.