शेटे चौकातील रेशन दुकानाला शॉर्टसर्किटने आग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 21 : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शेटे चौकातील श्रीकांत शेटे यांच्या रेशनिंग दुकानाला पहाटे पाचच्या दरम्यान शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत अंदाजे 4 लाखाचे नुकसान झाले. दरम्यान, या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. सातारा अग्निशमनदलाने तत्काळ घटनास्थळी येत आग आटोक्यात आणल्याने अधिक नुकसान टळले.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरातील खालच्या रस्त्यावरील मध्यवर्ती ठिकाणी शेटे चौकात श्रीकांत शेटे यांचे रेशनिंगचे धान्य वाटप दुकान आहे. याच दुकानाशेजारी त्यांची ब्रिटानिया बिस्कीट आणि अन्य वस्तूंची एजन्सी असलेले गोडावूनही आहे. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान शेटे यांना श्‍वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने ते उठले असता त्यांना दुकानात आग लागल्याचे निर्दशनास आले. प्रचंड धूर झाल्याने घरातील सर्वांना त्यांनी इमारतीच्या टेरेसवर पाठवले व तातडीने अग्निशमनदल व पोलिसांना कळवले. दहा ते पंधरा मिनिटात पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. यावेळी पेठेतील नागरिक व प्रकाश गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान अर्ध्या तासाने आग आटोक्यात आली. मात्र या आगीत रेशनिंग दुकानातील वितरित करण्यासाठी आणलेले गहू, तांदूळ याची 100 पोती, 40 किलो डाळ जळून खाक झाली तसेच ब्रिटानिया बिस्किट व अन्य आयटीसी कंपनीची इतर बिस्किट बॉक्सही जळाले. या ठिकाणी असलेले इमारतीमधील पाच विजेचे मीटरबॉक्स, गणपती मंडळाचे हॅलोजन, दोन सीसीटीव्ही कॅमेरेही जळाले. दरम्यान, पोलिसांनी सकाळी पावणेदहा वाजता या आगीच्या घटनेचा पंचनामा केला तसेच पुरवठा अधिकारी  दळवी यांनीही या घटनास्थळी भेट देेत नुकसानीची पाहणी केली. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी करत शेटे यांना दिलासा दिला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!