
दैनिक स्थैर्य | दि. १४ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार फलटण तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचा लाभ घेणार्या सर्व शिधापत्रिकाधारक व शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड रास्तभाव दुकानदाराकडून २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सत्यापन (व्हेरीफिकेशन) करून घेण्याचे आवाहन फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.
ज्या व्यक्तींचे आधार सत्यापन (व्हेरीफीकेशन) होणार नाही, त्यांचे शिधापत्रिकेमधून नाव वगळले गेल्यास किंवा त्यांचा लाभ बंद झाल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित शिधापत्रिकाधारकाची राहील, असेही तहसीलदार जाधव यांनी सांगितले आहे.
तसेच शिधापत्रिकेमधील जे सदस्य मयत आहेत; परंतु त्यांचे नाव शिधापत्रिकेमधून वगळण्यात आलेले नाही, अशा सदस्यांचे नाव तात्काळ कमी करून घेण्यासाठी मयत व्यक्तीचा मृत्युदाखला, आधारकार्ड व शिधापत्रिका घेऊन तहसील कार्यालय, फलटण (पुरवठा शाखा) येथे संपर्क साधावा, असे आवाहनदेखील तहसील कार्यालय फलटण यांचेतर्फे करण्यात येत आहे.