
स्थैर्य, सातारा, दि. 4 ऑक्टोबर : दरवर्षीप्रमाणे यंदाही सातारा शहरामध्ये रा. स्व. संघातर्फे विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा संघटनेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्यामुळे संघटना विस्ताराचा विचार करून चार ठिकाणी उत्सवांचे आयोजन केले आहे. यापैकी दोन ठिकाणी उत्सव उत्साहात झाले व विजयादशमीच्या निमित्ताने सातारा शहरात दोन ठिकाणी संचलन देखील करण्यात आले.
गावभागातील विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव रविवार दि. 28 रोजी न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे उत्साहात झाला. या उत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कन्हैयालाल पुरोहित हे उपस्थित होते. संघ ही केवळ स्वतःचा, स्वतःच्या संघटनेच्या विकासाचा विचार न करता संपूर्ण राष्ट्राच्या हिताचा विचार करणारी संघटना आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून रा. स्व. संघ समरसता गतिविधि अखिल भारतीय सह प्रमुख श्री. रविंद्र किरकोळे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना श्री.रविंद्र किरकोळे म्हणाले की साधनहीन लोकांचा बलसंपन्न लोकांसोबत लढा देण्याचा भारताचा इतिहास आहे. यात सत्याचाच विजय होत असल्याचेही इतिहासामधून आपल्यासमोर आले आहे. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने गतीने बदलत असणार्या समाजाला बरोबर घेऊन जाताना छोट्या छोट्या गोष्टीतून समाज परिवर्तन घडवण्याची आवश्यकता देखील आहे. त्यामुळेच रा.स्व.संघाने शताब्दी वर्षांमध्ये कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण, नागरी शिष्टाचार आणि स्व बोध ही पंचपरिवर्तनाची सूत्रे समोर मांडली आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात यावरून वाटचाल केली तर अधिक चांगल्या पद्धतीने जीवन जगता येईल.
दसर्याचा दुसरा उत्सव शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी पत्रकार भवन येथे पार पडला. यावेळी प्रसिद्ध व्यावसायिक व्यंकटराव मोरे हे प्रमुख पाहुणे होते. शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा संघचालक डॉक्टर अभयराव देशपांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दसर्याच्या दिवशी सकाळी सातारा शहरातील गावभागात संचलन आयोजित केले होते. न्यू इंग्लिश स्कूल पासून सुरु झालेले हे संचलन सोमवार पेठ मार्गे गोल मारुती लक्ष्मी नारायण मंदिर, मंगळवार तळे, विठोबाचा नळ, राजपथावरून वाघाच्या नळी मार्गे इंग्लिश स्कूल असा संचालनाचा मार्ग होता.
या दिवशीच सायंकाळी पाच वाजता शाहूपुरी भागामध्ये दुसरे संचलन आयोजित केले होते. अर्क शाळा मैदान, गेंडामाळ नाका, शाहूपुरी चौक, रांगोळ कॉलनी, पवार कॉलनी, गजानन महाराज मंदिर मार्गे, अर्कशाळा मैदान या मार्गावर हे संचलन झाले.
या सर्व कार्यक्रमांमध्ये प्रांत समरसता गतिविधि सहप्रमुख मुकुंदराव आफळे, सातारा जिल्हा संघचालक डॉक्टर अभयराव देशपांडे, सातारा शहर संघचालक एडवोकेट नितीनराव शिंगटे, सातारा जिल्हा कार्यवाह महेशजी शिवदे, सातारा जिल्हा सहकार्यवाह संदीप आठले, शहर कार्यवाह रविराज गायकवाड, मनोज नेने आणि नितीन बनकर यांचा सहभाग होता.
दोन्ही संचलनात स्वयंसेवक व संघहितेशी मिळून सुमारे साडेपाचशे पेक्षा जास्त लोकांचा सहभाग राहिला. संचलन मार्गावर विविध मंडळे संस्था व नागरिकांनी पायघड्या रांगोळ्या घालून, फुले उधळून स्वयंसेवकांचे स्वागत केले. काही ठिकाणी शुभेच्छा बॅनर देखील यावेळी लावण्यात आले होते. विविध लोकप्रतिनिधींनी यात सहभाग घेतला. मंगळवार तळे येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील फुले उधळून स्वागत केले.