
स्थैर्य, सातारा, दि. 25 सप्टेंबर : – शताब्दीवर्ष साजरे करणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून विविध कार्यक्रमांची सुरुवात येणार्या विजयादशमी उत्सवापासून केली जाणार आहे. त्यानुसार सातारा शहरात देखील चार ठिकाणी विजयादशमी उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघाचे सातारा शहर कार्यवाह रविराज गायकवाड आणि शहर संघचालक अॅड. नितीन शिंगटे यांनी दिली. संघाच्यावतीने वर्षभर आयोजित करणार्या कार्यक्रमांमध्ये गृहसंपर्क अभियानाद्वारे संघ स्वयंसेवक घरोघरी जाऊन संघाबद्दल माहिती देणार आहेत. तसेच विविध ठिकाणी हिंदू संमेलने आयोजित करण्यात येणार आहेत.
याखेरीज महिला, युवा व बाल यांच्यासाठी देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. विजयादशमीचा सातारा शहरातील पहिला उत्सव शनिवारी दि. 27, सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कोडोलीच्या पत्रकार भवनात होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्यावसायिक व्यंकटराव मोरे आणि वक्ते म्हणून जिल्हा संघचालक डॉ. अभयराव देशपांडे आहेत. दुसरा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दि. 28 रोजी सायंकाळी सहा वाजता प्रमुख पाहुणे उद्योजक कन्हैयालाल राजपुरोहित आणि संघाचे अखिल भारतीय समरसता गतिविधि सहप्रमुख रवींद्र किरकोळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तिसरा कार्यक्रम दि. 4 ऑक्टोबर रोजी कूपर कॉलनी सभागृहात प्रमुख पाहुणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे आणि वक्ते सातारा जिल्हा प्रचारक निलेश शेळके यांच्या उपस्थितीत होईल. चौथा कार्यक्रम दि. 5 ऑक्टोबर रोजी शाहूपुरीतील हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला मासचे माजी अध्यक्ष उद्योजक राजेंद्र मोहिते प्रमुख पाहुणे आणि नितीन पोरे वक्ते आहेत. विविध ठिकाणी होणार्या उत्सवासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन रविराज गायकवाड आणि अॅड. नितीन शिंगटे यांनी केले आहे.
दसर्याला दोन ठिकाणी संचलन
विजयादशमीनिमित्त संघाचे संचलन शहरामध्ये दोन ठिकाणी होणार आहे. त्यानुसार पहिले संचलन दि. 2 ऑक्टोबर दसर्याच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता न्यू इंग्लिश स्कूल येथून निघून सोमवार पेठ, आझाद चौकमार्गे गोल मारुती मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, नागाचा पार, मंगळवार तळेमार्गे विठोबाचा नळ येथून मोती चौक, देवी चौक, वाघाची नळी यामार्गे पुन्हा न्यू इंग्लिश स्कूल येथे येईल. दुसरे संचलनही त्याच दिवशी म्हणजे दि. 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी शाहूपुरी भागात होईल. त्याचा मार्ग अर्कशाळा मैदान, गेंडामाळ नका, शाहपुरी चौक, रांगोळे कॉलनी, पवार कॉलनी, गजानन महाराज मंदिर मार्गे अर्कशाळा मैदान असा असणार आहे.