रासपचे आज राज्यभर दूध बंद आंदोलन : तालुकाध्यक्ष रमेश बबन चव्हाण (सातपुते)

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आज शनिवार दि. १ ऑगस्ट रोजी राज्यभर दूध बंद आंदोलन पुकारण्यात आले असून राज्यातील सहकारी व खाजगी दूध संस्था, संकलन केंद्रांनी उद्या आपले दूध संकलन बंद ठेवावे अशी मागणी निवेदनाद्वारे रासप ने या सर्व दूध संस्था व संकलन केंद्रांना केली असल्याचे रासप तालुकाध्यक्ष रमेश बबन चव्हाण (सातपुते) यांनी सांगितले.

करोना वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर  लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे गेली ३/४ महिने सर्व उद्योग व्यवसाय बंद असताना अनंत अडचणींवर मात करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपले कामकाज सुरळीत सुरु ठेवल्याने आपणास नियमीत व पुरेसा दूध पुरवठा होत राहिला, त्याची नोंद घेऊन आपण दूध दर वाढ व अनुदान मागणीच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्या दूध संकलन बंद ठेवावे अशी मागणी रासपने या संस्थांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रासपने दुधाला प्रति लिटर २५ रुपये दर आणि प्रति लिटर १० रुपये शासकीय अनुदान दूध उत्पादकांचे खात्यावर जमा करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी निवेदने, मोर्चे, आंदोलने, चर्चा या शांततेच्या मार्गाने गेली ४ महिने प्रयत्न सुरु ठेवले मात्र शासन/प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याने उद्या शनिवार दि. १ ऑगस्ट रोजी राज्यभर दूध बंद आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

आपणा सर्वांचे व्यवसाय दूध उत्पादक शेतकऱ्यावर अवलंबून असल्याने उद्या आपले दूध संकलन बंद ठेवून या आंदोलनास पाठींबा द्यावा अशी मागणी करतानाच कोठे दूध संकलन झाल्याचे आढळल्यास सदरचे दूध गोरगरिबांना वाटण्यात येणार असल्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. 

निवेदनावर जिल्हा नियोजन व विकास समितीचे माजी सदस्य काशीनाथ शेवते, जिल्हा संपर्क प्रमुख खंडेराव सरक, तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण, युवक आघाडी तालुकाध्यक्ष निलेश लांडगे, दूध संघ संचालक शेखर खरात, सातारा जिल्हा प्रवक्ता संतोष ठोंबरे यांच्या सह्या आहेत तथापी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी असून दूध उत्पादकांनी सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला असल्याचे खंडेराव सरक यांनी निदर्शनास आणून दिले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!