राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रकुल पदक विजेत्या अविनाश साबळेला परमार्थ खेल रत्न पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । टाटा स्मृती रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे व उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे यांना त्यांच्या कर्करोग उपचार, शल्यक्रिया व संशोधनातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘परमार्थ रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे उभयतांना हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये रौप्य पदक विजेत्या अविनाश साबळेला राज्यपालांच्या हस्ते ‘परमार्थ खेल रत्न’ पुरस्कार देण्यात आला. परमार्थ सेवा समिती या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित ‘दिपावली स्नेह संमेलन’ या कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात आले.

पाश्चात्य देशातील कर्करोगाच्या तुलनेत भारतात कर्करोगाचे प्रमाण कमी आहे, ही समाधानाची बाब असली तरी वाढत्या शहरीकरणासोबत कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण एकूण कर्करोगाच्या ४० टक्के जास्त असल्यामुळे सन २०३५ पर्यंत तंबाखूची शेती पूर्णपणे बंद केल्यास कर्करोगावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येईल, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र बडवे यांनी यावेळी केले.

लठ्ठपणामुळे १९ प्रकारचे कर्करोग होतात. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवल्यास वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता राखल्यास तसेच अन्न संरक्षण शास्त्रीय पद्धतीने केल्यास आणखी १५ टक्क्यांनी कर्करोगाचे प्रमाण कमी करता येईल, असे डॉ.बडवे यांनी सांगितले.

टाटा रुग्णालय दरवर्षी देशभरातून साडेचार लाख रुग्ण उपचारासाठी येतात असे सांगून वाराणसी, गुवाहाटी, विशाखापट्टणम, पंजाब व खारघर येथे कर्करोग उपचारासाठी इस्पितळे उभारली गेली असली तरी देखील टाटा रुग्णालयात येत्या काही वर्षात येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दहा लाख इतके असेल, असे डॉ. श्रीखंडे यांनी सांगितले. कर्करोगाच्या प्रभावी उपचारासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्करोग विशेषज्ज्ञ निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

तंबाखू शिवाय युवकांमध्ये अंमली पदार्थांचे वाढते व्यसन चिंतेची बाब असल्याचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी सांगितले. रुग्णसेवा करणे हा सच्चा परमार्थ असल्याचे सांगून देशाला क्षयरोग मुक्त करण्यासाठी लोकांनी क्षयरोग रुग्णांना दत्तक घेऊन त्यांचा पोषण आहार खर्च वहन केल्यास, तो देखील परमार्थ ठरेल असे राज्यपालांनी सांगितले.

परमार्थ सेवा समिती टाटा रुग्णालय येथे ५० कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र किमोथेरपी केंद्र बांधून देणार असून या केंद्राच्या माध्यमातून दररोज ५०० रुग्णांना मदत होईल असे परमार्थ सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण बियाणी यांनी सांगितले.

कार्यक्रमाला बिर्ला समूहाच्या संचालक राजश्री बिर्ला, परमार्थ सेवा समितीचे कार्याध्यक्ष मनमोहन गोयंका, महिला समितीच्या प्रमुख शारदा बुबना व सूत्रसंचालक अनिल त्रिवेदी प्रामुख्याने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!