
स्थैर्य, फलटण, दि. ३ ऑक्टोबर : निसर्गसंपदेने नटलेल्या फलटण तालुक्याच्या जैवविविधतेत भर टाकणाऱ्या ‘पिचू पोपट’ (Vernal Hanging Parrot) या दुर्मिळ पक्षाची नोंद झाली आहे. नेचर अँड वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटीचे उपाध्यक्ष आणि वन्यजीव छायाचित्रकार गणेश धुमाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या सुंदर पक्षाला कॅमेऱ्यात कैद केले आहे.
गेले काही दिवस सोशल मीडियावर ‘पिचू पोपट’ या पक्षाची छायाचित्रे पाहून, आपल्या परिसरात त्याचा शोध घेण्याचे गणेश धुमाळ, सुभाष जाधव आणि अनिकेत सोनवलकर यांनी ठरवले. पक्षाच्या अधिवासाचा अभ्यास करून, डोंगरमाथ्याच्या उंच झाडीच्या परिसरात त्यांनी पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली. एका ठिकाणी लँडस्केप फोटोसाठी थांबले असता, त्यांना बाजरीच्या शेतात मुनिया पक्ष्यांचा थवा दिसला. त्याच थव्यात एक वेगळाच हिरव्या रंगाचा पक्षी बाजरीच्या कणसावर ताव मारताना आढळला. जवळ जाऊन पाहिले असता, तोच ‘पिचू पोपट’ असल्याचे स्पष्ट झाले. ज्या पक्षाला शोधण्यासाठी ते मुद्दाम बाहेर पडले होते, तो अनपेक्षितपणे आढळल्याने त्यांना ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ असा अनुभव आला.
असा आहे ‘पिचू पोपट’
शास्त्रीय भाषेत ‘लॉरिक्युलस व्हरनालिस’ (Loriculus vernalis) नावाने ओळखला जाणारा हा पक्षी साधारण १४ सें.मी. लांबीचा असतो. त्याचा मुख्य रंग हिरवा असून चोच आणि शेपटीजवळील पिसे लाल रंगाची असतात. हा पक्षी सहसा पूर्व हिमालय ते कन्याकुमारीपर्यंतच्या आर्द्र पानगळीच्या जंगलात उंच झाडांवर आढळतो. फलटणसारख्या तुलनेने कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात त्याचे दर्शन होणे हे येथील समृद्ध जैवविविधतेचे द्योतक मानले जात आहे.