
स्थैर्य, सातारा, दि. 27 डिसेंबर : किसन वीर महाविद्यालयाच्या परिसरात एक दुर्मिळ मून मॉथ सहायक प्राध्यापक जितेंद्र चव्हाण व ग्रंथालय परिचर ऋषिकेश शिंदे यांना आढळून आल्याने विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि निसर्गप्रमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्राणीशास्त्र विभागातील सहा. प्राध्यापक राहुल तायडे यांनी सांगितले की, मून मॉथ सहसा घनदाट जंगल परिसरात दिसतो आणि शहरी भागात त्याचे दर्शन होणे फारच दुर्मिळ आहे. त्यामुळे महाविद्यालयाचा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असल्याचे हे एक सकारात्मक लक्षण आहे, मून मॉथ म्हणजे चंद्र पतंग, जो त्याच्या चंद्रासारख्या दिसणार्या, हिरवट-पिवळ्या रंगाच्या आणि लांब शेपटीच्या पंखांमुळे ओळखला जातो; हे सुंदर आणि दुर्मिळ पतंग निसर्गात आढळतात आणि त्यांचे पंख मखमली व पारदर्शक नक्षी असलेले असतात, जे पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहेत. नाजूक पंखांचा सुंदर पतंग पाहण्यासाठी गर्दी केली होती.
विद्यार्थ्यांनी या पतंगाचे छायाचित्रणकरताना त्याला कोणतीही इजा न करता नैसर्गिक अधिवासात सोडले. निसर्ग संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा प्रसंग प्रेरणादायी ठरत आहे.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, महाविद्यालयाच्या परिसरात दुर्मिळ असा मून मॉथ आढळणे ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे. यावरून आपल्या परिसरातील नैसर्गिक पर्यावरण संतुलित व जैवविविधतेने समृद्ध असल्याचे स्पष्ट होते. आम्ही शैक्षणिक गुणवत्तेसोबत पर्यावरण संवर्धनालाही तितकेच महत्त्व देतो. विद्यार्थ्यांनी या घटनेतून निसर्गाचा आदर करावा, जैवविविधतेचे संरक्षण करावे आणि अशा दुर्मिळ प्रजातींबाबत वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करावा, हीच अपेक्षा आहे.

