
स्थैर्य, सातारा, दि. 28 नोव्हेंबर : वन्यजीव संवर्धनासाठी अग्रेसर असलेल्या आदर्शगाव किरकसालच्या शिवारात दुर्मिळ असणार्या राज्यपक्षी हरियालचे दर्शन झाले आहे. अभ्यासकांनी या पक्ष्याची चित्रफीत बनवली असून, आणखी एका दुर्मिळ पक्ष्याची नोंद झाल्याने किरकसालकरांना जैवविविधतेच्या कामामध्ये मोठे यश मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे. यापूर्वी राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉनचे दर्शन झाले होते.
ग्रामस्थांनी गेल्या काही वर्षांपासून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी गावपातळीवर जैवविविधता समितीची स्थापना करून या कामाला पाठबळ दिले जात आहे. ग्रामपंचायत, स्थानिक ग्रामस्थ व वन विभागाच्या सहकार्यातून विविध उपक्रम, कार्यशाळा, व्याख्याने आयोजित करून यासाठीप्रयत्न केले जात आहेत. जैवविविधतेमध्ये सकारात्मक यश मिळत असल्याने राज्य, परराज्यातून अभ्यासकही येथे भेटी देत आहेत.
किरकसालच्या शिवारात ’राज्यपक्षी’ सलेल्या हरियाल किंवा पिवळ्या पायाची हरोळीचे अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण दर्शन झाले आहे. गावात आत्तापर्यंत 200 हून अधिक प्रजातींच्यापक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. हरोळी पक्ष्याचा प्रमुख अधिवास हा सदाहरित व निमसदाहरित आणि पानगळीच्या जंगलात तसेचविपुल प्रमाणात देशी फळझाडीच्या ठिकाणी असतो. मात्र, किरकसालचा परिसर हा दख्खन पठारावरील माळरान आणि शुष्क काटेरी जंगलांचा आहे. त्यामुळे या कोरड्या वातावरणात हरियालचे दर्शन होणे हे येथील जैवविविधता संवर्धन कार्यासाठी आश्वासक बाब ठरली आहे.
किरकसालमध्ये संवर्धन प्रकल्पाचे सर्वेक्षण करणार्या टीमला डांबी खोर्यामध्ये हा देखणा पक्षी पिपरीणीच्या झाडावर बसलेला आढळला. हरियाल हा फळे खाणारा पक्षी असून, डांबी खोर्यात मोठ्या प्रमाणात फळझाडे उपलब्ध असल्यानेच या पक्ष्याचे आगमन झाले असावे, असा अंदाज वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. हरियाल पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो सहसा जमिनीवर न उतरता झाडांवरच आपला जीवनक्रम पूर्ण करतो आणि वड, पिंपळ, उंबर, पिंपर यांसारखो फळे आवडीने खातो.
या दुर्मिळ पक्ष्यांच्या दर्शनाची नोंद सर्वेक्षण टीममधील वन्यजीव अभ्यासकांनी केली. यामध्ये अभ्यासक चिन्मय सावंत, अर्णव गंधे, अभिजित माने, प्रथमेश काटकर, विशाल काटकर व आर्यन शिंदे यांचा समावेश होता. या वेळी ’ग्रीन हब सेंट्रल इंडिया’ या संस्थेच्या माध्यमातून वन्यजीव संवर्धनाची चित्रफीत बनवण्यासाठी आलेले किशन ठाकूर व हरेकृष्ण देखील उपस्थित होते. दरम्यान, 2021 मध्ये याच किरकसाल परिसरातील नळीच्या माळावरून राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉनचे दर्शन झाले होते. त्यापाठोपाठ आता राज्य पक्ष्याचे दर्शन होणे, ही येथील जैवविविधतेच्या दृष्टीने खूप मोठी सकारात्मक घटना आहे.
डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाच्याकिरकसाल संवर्धन प्रकल्पाच्या प्रयत्नांमुळे येथील वनात फळझाडांचे संरक्षण करण्यात आले. त्यामुळे हरियालसारखे पक्षी या कोरड्या अधिवासाकडे आकर्षित होत आहेत. हे निरीक्षण परिसराच्या पर्यावरणीय आरोग्यात सुधारणा होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
– चिन्मय सावंत, वन्यजीव अभ्यासक, किरकसाल.

