स्थैर्य, पॅरिस, दि. 27 : भारतात येण्यासाठी राफेल फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून उड्डाण केले आहे. पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर विमाने बुधवारी (29 जुलै) रोजी भारतात दाखल होणार आहेत. हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर या राफेल विमानांचा तळ असेल. 2016 मध्ये भारताने फ्रान्स सरकार बरोबर 36 राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा 59 हजार कोटींचा करार केला आहे.
राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी भारतीय वायुसेनेचे बारा वैमानिक आणि इंजिनिअरिंग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे. उड्डाणावस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात येईल तसेच अंबालामध्ये येण्यापूर्वी ही विमाने युएईमधील फ्रेंच तळावर उतरतील. फ्रान्समधील तळावरून उड्डाण करण्यापूर्वी फ्रान्समधील भारतीय राजदूताने भारतीय वैमानिकांबरोबर चर्चा केली.
सर्व काही नियोजनानुसार झाले, तर 20 ऑगस्टला पारंपरिक पद्धतीने सोहळा आयोजित करून या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येईल.
भारतीय वायुसेनेच्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला हे विमान कसे हाताळायचे, त्याबद्दल व्यापक असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारताने फ्रान्सबरोबर अशी 36 राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमाने फ्रान्सकडून भारताला देण्यात येतील. भारतात दाखल झाल्यानंतर लवकरात लवकर या विमानांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.
राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्चिम बंगाल हाशिमारा येथे असेल. भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. यामुळे शत्रूच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे तसेच हवाई वर्चस्व सुद्धा प्रस्थापित करता येईल. सध्या चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे एकही विमान नाही.
फ्रान्समधून उड्डाण घेतल्यानंतर राफेल विमानांचा प्रवास निश्चित करण्यात आला आहे. अनेक देशांच्या सीमा ओलांडून राफेल भारतात प्रवेश करणार आहे. फ्रान्स ते भारतापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी राफेल जवळपास 1000 कि.मी. प्रतितास इतक्या वेगाने उड्डाण करणार आहे. राफेलचा सर्वाधिक वेग हा 2222 कि.मी. प्रति तास इतका आहे.
राफेल जेट्स अबूधाबी येथील अल धाफरा येथील हवाई तळावर उतरतील. सुमारे दहा तासाच्या या प्रवासात दोन विमाने त्यांच्याबरोबर हवेत इंधन भरण्यासाठी येणार आहेत. रात्रभर अबूधाबीमध्ये थांबल्यानंतर राफेल भारताकडे येण्यासाठी उड्डाण घेतील. या प्रवासादरम्यान दोनदा विमानात इंधन हवेतून भरले जाईल. राफेलच्या पायलट्सना हवेत असताना इंधन भरण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
या विमानांनी फ्रान्समधून उड्डाण करण्यापूर्वी फ्रान्समधील भारतीय राजदूतांनी तिथे जाऊन भारतीय वैमानिकांची भेट घेतली. डासू कंपनीने वेळेवर या विमानांची डिलिव्हरी केल्याबद्दल तसेच फ्रेंच एअरफोर्स आणि तिथल्या सरकारचे आभार मानले. ही विमाने भारतात घेऊन येणे, ही भारतीय वैमानिकांसाठी अभिमानाची बाब असून ते उड्डाणासाठी प्रचंड उत्सुकता आहे. राफेलमुळे भारताची हवाई शक्ती कैकपटीने वाढणार आहे, असे भारतीय राजदूतांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.