स्थैर्य, नागठाणे,दि ६: बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मूकबधिर वृद्धेवर तीस वर्षीय युवकाने बलात्कार करण्याची घृणास्पद घटना बुधवारी दुपारी घडली.गुरुवारी या घटनेची माहिती बोरगाव पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ हालचाल करून संशयित युवकास अटक केली.सूरज दत्तात्रेय पवार (रा.मांडवे,ता.सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागठाणे परिसरातील डोंगरपायथ्याशी वसलेल्या एका गावातील वृद्ध मूकबधिर महिलेवर अत्याचार झाल्याची माहिती सपोनि डॉ.सागर वाघ यांना गुरुवारी मिळाली.यावेळी सपोनि डॉ.सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर व पोलिसांनी तात्काळ एक मूकबधिर व्यक्तींची भाषा जाणणाऱ्या एका शिक्षिकेला सोबत घेऊन घटनास्थळ गाठले.
यावेळी पोलिसांनीअधिक माहिती घेत असता अत्याचारग्रस्त मूकबधिर वृद्ध महिला भाऊ व आईसोबत राहते. बुधवारी दुपारी ही महिला तिच्या घरातील पडवीत झोपली असता सूरज दत्तात्रेय पवार याने तिच्यावर अत्याचार केला अशी माहिती अत्याचारग्रस्त वृद्धेने खुणेद्वारे दिली.वृद्धेने यावेळी आरडाओरडा केला असता शेजारील महिला मदतीसाठी धावत आल्याचे पाहून संशयिताने तेथून पलायन केले.या घटनेची फिर्याद गुरुवारी रात्री बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून रात्री उशिरा पोलिसांनी संशयित सूरज दत्तात्रेय पवार याला अटकही केली. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आंचल दलाल करत आहेत.