अल्पवयीन मुलीवर बलात्कार : मूकबधिर पीडितेने ‘माैन’ साेडले; नराधमाला 20 वर्षे सक्तमजुरी; बीडच्या न्यायालयाचा निकाल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.११: महिला अत्याचाराच्या प्रकरणात बदनामीच्या भीतीपाेटी किंवा कुणाच्या तरी दबावाखाली येऊन पीडिता तक्रार देण्यासाठी धजावत नाहीत, त्यामुळे अनेक नराधम कायद्याच्या कचाट्यातून सुटून उजळ माथ्याने समाजात फिरतात. पुन्हा असे गुन्हे करायलाही माेकाट राहतात. बीडमधील एका अल्पवयीन पीडितेने मात्र मूकबधिर असूनही ‘माैन’ साेडून आपल्यावरील अत्याचाराचा पाढा दुभाष्याच्या मदतीने न्यायालयासमाेर वाचला. त्यामुळे एका नराधमाला २० वर्षे तुरुंगात खडी फाेडायला पाठवणे शक्य झाले. अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्या. नाझिया शेख यांनी हा निकाल दिला.

पुणे येथील एका सेवाभावी संस्थेमध्ये दाखल असलेली एक १६ वर्षीय व जन्मत: मतिमंद असलेली मुलगी गरोदर असल्याची तक्रार तेथील अधीक्षकांनी ९ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल केली हाेती. ही पीडित मुलगी बीड तालुक्यात आपल्या गावी असताना अाराेपीने असहायतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. पुणे पाेलिसांनी तिचा जबाब नोंदवून प्रकरण बीड ग्रामीण ठाण्याकडे वर्ग केले. आराेपीवर पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी केला. पीडितेच्या गावात सालगडी म्हणून काम करणाऱ्या तुकाराम ज्ञानदेव कुडूक (३२, रा. तिंतरवणी, ता. शिरूर) यानेच अत्याचार केल्याचे समाेर आले. त्याला अटकही करण्यात आली. सबळ पुरावे हाती लागल्याने बल्लाळ यांनी आराेपीविराेधात बीडच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्या. नाझिया शेख यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी काम पाहिले. या प्रकरणात ९ साक्षीदार तपासण्यात आले. तपास अधिकारी म्हणून सहायक फौजदार एन. वाय. धनवडे यांनी पाहिले.

‘करपल्लवी’च्या मदतीने कळल्या भावना
पीडिता मूकबधिर असल्याने आपली व्यथा न्यायालयासमाेर मांडणे तिच्यासाठी आव्हानात्मक हाेते. मग न्यायालयाच्या परवानगीने बीडमधील मूकबधिर शाळेतील शिक्षकांची मदत घेण्यात आली. बाेटांच्या साह्याने खाणाखुणा करण्याच्या ‘करपल्लवी’ या सांकेतिक भाषेचा वापर करून पीडितेने आपबीती कथन केली. ती शिक्षकांनी न्यायालयास सांगितली. काेर्टात हजर आराेपीकडे बाेट दाखवून याच नराधमाने पल्यावर अत्याचार केल्याचेही तिने न्यायाधीशांना सांगितले. अखेर दाेन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी तुकाराम कुडूक याला २० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

दिव्य मराठी भूमिका

माैन साेडू, चला बाेलू
माणुसकीला काळिमा फासत अत्याचार करणाऱ्या नराधमांना धडा शिकवायचा असेल, तर पीडित महिलांनी किंवा असे प्रकार पाहणाऱ्यांनी अशा प्रवृत्तींविराेधात आवाज उठवण्याची गरज आहे. यासाठी दैनिक दिव्य मराठीने ‘माैन साेडू, चला बाेलू’ हे अभियान रातरागिणींसाेबत सुरू केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दाेन पीडितांनी जवळच्या व्यक्तींकडून हाेणाऱ्या अत्याचारांची पाेलिसात तक्रार करण्याचे धाडस दाखवले हाेते. कुठलीही भीडभाड न ठेवता यंत्रणेकडे न्याय मागण्यासाठी महिलांनी पुढे येण्याची तयारी दाखवली, तरच अशा रानटी प्रवृत्तींचा संसर्ग राेखणे शक्य हाेणार आहे. या पार्श्वभूमीवर बीडमधील रातरागिणीने दाखवलेले धाडस खराेखरच काैतुकास्पद हे.


Back to top button
Don`t copy text!