दैनिक स्थैर्य | दि. ०३ जानेवारी २०२५ | फलटण | फलटण शहरातील रेव्हेन्यू क्लबची दुरावस्था दूर करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी या इमारतीची पाहणी केली असून लवकरच या क्लबचे नूतनीकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. रेव्हेन्यू क्लबची सध्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे. एकेकाळी वैभवशाली असलेली ही इमारत आता मोडकळीस आली आहे. इमारतीची अवस्था इतकी बिकट आहे की तिच्या खाली उभे राहणेही धोकादायक वाटते; असे मत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
या इमारतीत सर्कल अधिकारी आणि तलाठी यांचे कार्यालय आहे. मात्र त्यांना अत्यंत खराब परिस्थितीत काम करावे लागत आहे. सर्कल तलाठ्यांना कचऱ्यासारख्या वातावरणात बसवण्यात आले आहे. माजी खासदार रणजितसिंह यांनी या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी म्हटले की, “या रेव्हेन्यू क्लबचे पुनर्जीवन करणे आणि चांगल्या पद्धतीचे रेव्हेन्यू कार्यालय या ठिकाणी उपलब्ध करून देणे ही नैतिक दृष्ट्या आपली जबाबदारी आहे.”
रणजितसिंह यांनी पुढे सांगितले की या संकटरूपी इमारतीतून तलाठी, सर्कल अधिकारी आणि येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मुक्त करण्याच्या हेतूने पुढची पावले टाकली जाणार आहेत. या नूतनीकरणामुळे फलटणमधील महसूल विभागाच्या कामकाजात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
यावेळी मुख्याधिकारी निखिल मोरे, फलटणचे निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, महाराजा उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, भाजपा शहराध्यक्ष अनुप शहा, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, माजी नगरसेवक अजय माळवे, सुधीर अहिवळे यांच्यासह फलटण शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.