
“फलटण शहराला निधी कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री जयकुमार गोरे पाठीशी आहेत. येत्या ६ महिन्यात शहर खड्डेमुक्त करणार,” माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ग्वाही. नगराध्यक्ष समशेरसिंहांचा विरोधकांना टोला. वाचा सविस्तर…
स्थैर्य, फलटण, दि. २२ जानेवारी : “फलटण शहर आता बदलत आहे आणि येणाऱ्या काळात ते नक्कीच बदलणार. शहराच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही, कारण आपल्या पाठीशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) खंबीरपणे उभे आहेत. तर आपल्या शहराचे आणि तालुक्याचे ‘वकीलपत्र’ मंत्री नामदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी घेतले आहे. त्यामुळे मी आज फलटणकरांना शब्द देतो की, येणाऱ्या ६ महिन्यात फलटण शहर १०० टक्के खड्डेमुक्त (Pothole Free) करू,” अशी खणखणीत ग्वाही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते.
विरोधकांचेही केले अभिनंदन!
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी राजकीय सौजन्य दाखवत नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सौ. प्रियादर्शनी रणजीतसिंह भोसले यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच आपल्या गटाचे स्वीकृत नगरसेवक अशोकराव जाधव, सुदाम (अप्पा) मांढरे यांच्यासह विरोधी गटातून असूनही स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून आलेले युवराज अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचेही मनापासून अभिनंदन केले.
स्व. हिंदुराव नाईक निंबाळकरांचे स्वप्न पूर्ण करणार : आ. सचिन पाटील
यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले, “लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी फलटण शहराच्या विकासाचे जे स्वप्न बघितले होते, ते पूर्णत्वास नेण्याचे काम रणजितसिंह आणि नगराध्यक्ष समशेरसिंह करत आहेत. त्यांच्या प्रत्येक निर्णयात आणि विकासकामात आम्ही ठामपणे त्यांच्या सोबत काम करत राहणार आहोत.”
पालिका कुणाच्या बापाची नाही, जनतेची! : समशेरसिंह
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “फलटण शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचे नेते रणजितदादांनी जे शब्द दिले आहेत, ते पूर्ण करण्यासाठी आमची सर्व नगरसेवकांची टीम सज्ज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही नगरपालिका कुणाच्याही खाजगी मालकीची नसून ती सर्वसामान्य जनतेच्या मालकीची आहे, हे लक्षात ठेवावे.”
कार्यक्रमाचे आभार नवनियुक्त उपनगराध्यक्ष सौ. प्रियादर्शनी रणजीतसिंह भोसले यांनी मानले. यावेळी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

