नोकरीच्या नावाखाली फक्त गंडवले; आता तुमच्या ‘चिठ्ठी’ची किंमत संपली!; ३० वर्षांच्या कमाईतील ३० दिवसांचे उत्पन्न गरिबांना देऊन दाखवा; ‘बिबी’च्या सभेत रणजितदादांची तोफ धडाडली


“३० वर्षांत तालुक्याऐवजी स्वतःचा विकास केला, त्यांच्या सत्तेचा आता ‘भंगारवाडा’ झाला आहे,” माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा रामराजेंवर घणाघात. बोगस सातबारा, एमआयडीसी विरोध आणि ३० दिवसांच्या उत्पन्नाचे खुले आव्हान. वाचा बिबी येथील सभेचा सविस्तर वृत्तांत…

स्थैर्य, फलटण, दि. १९ जानेवारी : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फलटणमधील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. बिबी (ता. फलटण) येथे उद्योजक डी. के. बोबडे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्यात भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधकांवर अक्षरशः आगपाखड केली. “फलटणच्या ३० वर्षांच्या एकहाती सत्ताकाळाने तालुक्याचा विकास करण्याऐवजी फक्त स्वतःच्या घराचा विकास केला. त्यांच्या या ‘कमीशनराज’ मुळेच आता त्यांच्या सत्तेचा ‘भंगारवाडा’ झाला आहे,” असा सणसणीत टोला रणजितसिंह यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या गटाला लगावला.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात रामराजेंच्या ३० वर्षांच्या सत्तेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “ज्यांनी ३० वर्षे फक्त फसवणूक केली, तरुणांना नोकरीच्या नावाखाली गंडवले आणि स्वतःची घरे भरली, त्यांचा आता राजकीय अस्त झाला आहे. हे लोक ‘कमीशन’ घेऊन नोकऱ्या देणारे होते. आता त्यांचा ‘भंगारवाडा’ झाला असून, आता कोणीही त्यांच्या ‘चिठ्ठी’वर विश्वास ठेवत नाही. सत्तेत असताना त्यांनी स्वतःच्याच नात्यातील लोकांना नोकऱ्या लावल्या आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या मुलांना फक्त सतरंज्या उचलण्यासाठी वापरून सोडून दिले,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

“३० वर्षांच्या ‘अफाट’ कमाईतील फक्त ३० दिवसांचे उत्पन्न गरिबांना वाटून दाखवा!”

विरोधकांच्या संपत्तीवर आणि ३० वर्षांतील आर्थिक व्यवहारांवर निशाणा साधताना रणजितसिंह यांनी रामराजेंना एक खुले आणि थेट आव्हान दिले. ते म्हणाले, “मी तुमच्या ३० वर्षांच्या सत्तेचा हिशोब मागत नाही. तुम्ही ३० वर्षांत जी अफाट माया जमवली आहे, त्या कमावलेल्या उत्पन्नापैकी केवळ ‘३० दिवसांचे उत्पन्न’ तरी या तालुक्यातील गरिबांसाठी देऊन दाखवा.” रणजितसिंहांच्या या आव्हानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

बोगस सातबारा आणि “मिशा काढण्याचे” चॅलेंज!

यावेळी रणजितसिंह यांनी काही गंभीर प्रकरणांचा दाखला देत विरोधकांना अडचणीत आणले. “फलटण शहरात हॉस्पिटलच्या जागेचा बोगस सातबारा तयार करून सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न यांच्या मुलाने केला आहे. याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला. तसेच, नाईकबोमवाडी एमआयडीसीच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट आव्हान दिले. “नाईकबोमवाडी एमआयडीसी बंद पाडण्यासाठी रामराजेंनी ५ मिटिंगा घेतल्या आहेत. जर हे खोटे असेल, तर मी माझ्या मिशा काढीन. खोटे बोलून लोकांची दिशाभूल करणे आता बंद करा,” असे खुले आव्हान त्यांनी दिले.

विकासाच्या जोरावर जनतेसमोर : आमदार सचिन पाटील

यावेळी आमदार सचिन पाटील यांनी विकासाचा नारा दिला. “आम्ही राजकारण करण्यासाठी नाही, तर समाजकारण करण्यासाठी सत्तेत आलो आहोत. ३० वर्षांत जे झाले नाही, ते आम्ही करून दाखवू. विरोधक फक्त टीका करण्यात मग्न आहेत, पण आम्ही विकासाच्या जोरावर जनतेसमोर जात आहोत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

हिंगणगाव-वाठारमध्ये १०० टक्के यशाचा निर्धार

या मेळाव्यातूनच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यात आले. ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांनी, “हिंगणगाव गट आणि वाठार निंबाळकर गणातून १०० टक्के यश मिळवून देऊ,” असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमाला शिवरूपराजे खर्डेकर, विलासराव नलवडे, अभिजीत नाईक निंबाळकर, विक्रम भोसले यांच्यासह भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.


Back to top button
Don`t copy text!