फलटणच्या राजकारणात रणजितदादाच ठरले ‘धुरंधर’; ८-८ च्या बरोबरीतही सभापती खासदार गटाचाच झेंडा!


फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीत ८-८ असे समसमान संख्याबळ असतानाही सभापतीपदी खासदार गटाच्या शिवांजली भोसले तर उपसभापतीपदी राजे गटाचे अमोल सस्ते यांची बिनविरोध निवड झाली. लोकसभा पराभवानंतर रणजितदादांनी सलग विजय मिळवत आपणच राजकारणाचे ‘बाजीगर’ असल्याचे सिद्ध केले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 16 मार्च : फलटणच्या राजकीय आखाड्यात नेहमीच एखाद्या ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटासारखा थरार पाहायला मिळतो. फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीत खासदार गट आणि राजे गट यांच्यात ८ विरुद्ध ८ असा ‘काँटे की टक्कर’ सामना रंगल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष याकडे लागले होते. मात्र, “हार कर जीतने वाले को बाजीगर कहते है!” या प्रसिद्ध फिल्मी डायलॉगची अगदी तंतोतंत प्रचिती देत, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत धोरणी खेळी केली आहे. त्यांनी प्रतिष्ठेच्या सभापतीपदावर आपल्या ‘खासदार’ गटाचा झेंडा फडकवून फलटणच्या राजकारणात आपणच ‘धुरंधर’ असल्याचा सणसणीत मेसेज दिला आहे. पंचायत समितीच्या या विशेष सभेत सभापतीपदी खासदार गटाच्या कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले, तर उपसभापतीपदी राजे गटाचे अमोल सस्ते यांची बिनविरोध निवड झाली आहे.

आज फलटण पंचायत समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापती निवडीची ही विशेष सभा पार पडली. पंचायत समितीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (खासदार गट) आणि शिवसेना (राजे गट) यांच्यात ८-८ असे समसमान सदस्य निवडून आल्याने अभूतपूर्व अशी ‘टाय’ची परिस्थिती निर्माण झाली होती.

नक्की सभापती कोण होणार, यावरून मोठी धाकधूक होती. मात्र, पडद्यामागे झालेल्या वेगवान राजकीय घडामोडींनंतर दोन्ही गटांनी समंजस भूमिका घेत संभाव्य संघर्ष टाळला. अखेर सभापतीपदाची माळ खासदार गटाच्या कु. शिवांजली भोसले (साखरवाडी-पिंपळवाडी गण) यांच्या गळ्यात पडली, तर उपसभापतीपद राजे गटाचे अमोल सस्ते (जाधववाडी गण) यांना मिळाले.

राजकारणात “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!” असे का म्हटले जाते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची राजकीय कारकीर्द! गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह यांचा पराभव करण्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अत्यंत अचूक रणनीती आखली होती आणि त्यात त्यांना यशही मिळाले होते. मात्र, या मोठ्या पराभवाने खचून न जाता, “मैं झुकेगा नही!” या जिद्दीने रणजितदादांनी राखेतून भरारी घेतली. त्यांनी पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यात दणदणीत यश मिळवून स्वतःचे नेतृत्व पुन्हा प्रस्थापित केले.

विधानसभेच्या विजयानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. काही महिन्यांपूर्वी झालेल्या फलटण नगरपालिकेच्या अटीतटीच्या निवडणुकीतही रणजितदादांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत खुद्द श्रीमंत रामराजे यांचे सुपुत्र श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचाही दारुण पराभव झाला. आणि आता पंचायत समितीमध्ये ८-८ चे समान बलाबल असतानाही सर्वोच्च असे ‘सभापती’ पद स्वतःच्या गटाकडे खेचून आणत रणजितदादांनी आपली राजकीय ताकद दाखवुन दिली आहे.

सभापतीपद खासदार गटाकडे आणि उपसभापतीपद राजे गटाकडे आल्याने सध्या तरी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमधील मोठा राजकीय संघर्ष टळला आहे. मात्र, राजकीय वर्चस्वाची ही महालढाई इथेच थांबणार नाही. रणजितदादांच्या या धडाकेबाज रणनितीमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये “अपना टाईम आयेगा” नव्हे तर “अपना टाईम आ गया है” असा प्रचंड उत्साह संचारला आहे. पंचायत समितीवरील या वर्चस्वानंतर आता लवकरच तालुक्यात तब्बल १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. “ये तो सिर्फ ट्रेलर था, पूरी फिल्म अभी बाकी है,” अशी चर्चा आता फलटणच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


Back to top button
Don`t copy text!