
फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीत खासदार गटाच्या शिवांजली भोसले सभापती तर राजे गटाचे अमोल सस्ते उपसभापतीपदी विराजमान झाले आहेत. या ऐतिहासिक विजयानंतर दोन्ही गटांच्या दिग्गज नेत्यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
स्थैर्य, फलटण, दि. 16 मार्च : फलटण तालुक्याच्या राजकीय आणि विकासाच्या वाटचालीत आज एक अत्यंत ऐतिहासिक आणि सुवर्णपान जोडले गेले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि ‘विकासपुरुष’ अशी ओळख असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने फलटण पंचायत समितीवर पहिल्यांदाच आपला झेंडा फडकवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तब्बल दीड वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत आमदार सचिन पाटील यांच्या विजयाने सुरू झालेली विकासाची ही घोडदौड नगरपालिकेनंतर आता थेट पंचायत समितीच्या सत्तेपर्यंत पोहोचली आहे.
फलटण पंचायत समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज अत्यंत खेळीमेळीच्या आणि सकारात्मक वातावरणात पार पडल्या. यामध्ये पंचायत समितीच्या प्रतिष्ठेच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीच्या (खासदार गट) कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांची, तर उपसभापतीपदी शिवसेना (राजे गट) चे श्री. अमोल सस्ते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या बिनविरोध निवडीमुळे कोणताही राजकीय संघर्ष न होता संपूर्ण तालुक्यात आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निवडणुकीत एक अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक राजकीय घडामोड पाहायला मिळाली. पंचायत समितीच्या या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची युती होती. मात्र, सध्या देशात आणि राज्यात असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या भक्कम सत्तेचा प्रभाव आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकासकामांवरील अढळ विश्वास, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिन्ही विद्यमान सदस्यांनी आज भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला. सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या रणजितदादांच्या याच कुशल आणि समन्वयवादी राजकारणामुळे पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
राष्ट्रवादीच्या या महत्त्वपूर्ण प्रवेशामुळे आता फलटण पंचायत समितीमधील पक्षीय बलाबल अत्यंत रंजक स्थितीत आले होते. पंचायत समितीत भारतीय जनता पार्टी (खासदार गट) ८ सदस्य आणि शिवसेना (राजे गट) ८ सदस्य असे समसमान (८-८) बलाबल निर्माण झाले. संख्याबळ समान असले तरी, रणजितदादांच्या अचूक रणनीतीमुळे आणि धुरंधर राजकीय खेळीमुळे पंचायत समितीच्या सर्वोच्च पदावर (सभापती) भाजपचाच झेंडा डौलाने फडकला आहे.
सभापती आणि उपसभापती पदाची बिनविरोध निवड जाहीर होताच पंचायत समितीच्या आवारात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला. या ऐतिहासिक क्षणी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण-कोरेगावचे आमदार सचिन पाटील, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच, शिवसेना (राजे गट) च्या वतीने नवनिर्वाचित उपसभापती यांचे अभिनंदन करण्यासाठी माजी आमदार दीपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि स्वीकृत नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनीही प्रमुख उपस्थिती लावत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विधानसभेपासून ते नगरपालिकेपर्यंत आणि आता पंचायत समितीपर्यंत तालुक्यातील सर्वच महत्त्वाच्या सत्ताकेंद्रांवर जनतेने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वासाची मोहोर उमटवली आहे. खासदार गटाकडे पंचायत समितीत सत्ता हाती आल्यामुळे आता तळागाळातील सामान्य माणसाची कामे आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने व समन्वयाने मार्गी लागेल, असा ठाम विश्वास या ऐतिहासिक निवडीच्या निमित्ताने व्यक्त होत आहे.
