
‘३० वर्षे सत्तेत असूनही शहराचा विकास का झाला नाही,’ असा सवाल करत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी टीका केली. झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे देण्याचे आश्वासन. वाचा सविस्तर.
स्थैर्य, फलटण, दि. 13 डिसेंबर : “गेली ३० वर्षे सत्तेत असूनही फलटण शहराचा विकास झाला नाही. झोपडपट्टीवासियांना केवळ सातबाऱ्याचा धाक दाखवून मते घेतली गेली,” असा घणाघात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांवर टीका करण्याआधी आपल्या वडिलांनी ३० वर्षांत काय केले, हे आधी विचारावे, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मधील भाजप व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.
झोपडपट्टीवासियांना हक्काचे घर देणार
प्रभाग १० मधील समस्यांवर बोलताना रणजितसिंह यांनी विरोधकांचा समाचार घेतला. या भागातील अर्धा भाग विस्थापित आणि कष्टकरी लोकांचा आहे. विरोधकांनी ३० वर्षे झोपडपट्टीतील लोकांना ‘सातबारा आमच्या नावावर आहे’, अशी भीती दाखवून मते घेतली, असा आरोप त्यांनी केला.
“प्रत्यक्षात ते सातबारे नगरपालिकेच्या ओपन स्पेसचे आहेत. आम्ही सत्तेत आल्यावर या जागेचा वापर समाजासाठी करू. राजीव गांधी वसाहत, इंदिरा वसाहत, शिवाजीनगर गल्ली येथील रहिवाशांना त्याच जागेवर हक्काचे घर आणि त्यांच्या नावावर जागा करून देऊ. यासाठी वेळ पडल्यास विधानसभेतही आवाज उठवू.” – रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार
‘मिलिंद नेवसे विकासासाठी सोबत’
मिलिंद नेवसे यांच्या भाजप प्रवेशावरून सुरू असलेल्या चर्चांना रणजितसिंह यांनी पूर्णविराम दिला. “मिलिंद आप्पांनी दबावाखाली नाही, तर विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नगराध्यक्ष असताना त्यांना मोकळेपणाने काम करू दिले गेले नाही, सतत दबाव टाकला गेला. आता त्यांना आणि उमेदवार अमित भोईटे यांना काम करण्याची पूर्ण संधी मिळेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी स्वतः मिलिंद नेवसे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी कोणाच्याही दबावाखाली भाजपमध्ये आलेलो नाही. रणजितसिंह यांनी आणलेला विकासनिधी आणि भाजपची सत्ता पाहून मी विकासासाठी हा निर्णय घेतला आहे.”
सांस्कृतिक भवनावरून पलटवार
अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी सांस्कृतिक भवनाच्या निधीला विरोधकांनी स्थगिती दिल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना रणजितसिंह म्हणाले की, सांस्कृतिक भवनाचे काम विरोधकांनीच (दिलीपसिंह भोसले यांनी) केले होते. आम्ही नव्याने सांस्कृतिक भवन मंजूर करून आणले आहे. तुमचे वडील आणि तुम्ही ३० वर्षे सत्तेत होतात, मग तुम्ही काय केले? खोटे आरोप करण्यापेक्षा स्वतःचे ठोस काम दाखवा.
शहरासाठी १०० कोटींचा रोडमॅप
आम्ही शहरात तारांगण, रस्ते आणि आरोग्याच्या सुविधांसाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी आणला आहे. फलटणला खड्डेमुक्त आणि गटारमुक्त करून एक आधुनिक शहर बनवणे हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रभाग १० चे उमेदवार अमित भोईटे, सौ. मोमीन, विशाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

