पूरपरिस्थिती आटोक्यात आल्यावर विद्यमान खासदार प्रकटले : अमित रणवरे; पूरसदृश्य परिस्थितीत रणजितदादांची तत्परता


दैनिक स्थैर्य । 27 मे 2025 । फलटण । ‘‘फलटण शहरासह तालुक्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांची तत्परता संपूर्ण तालुक्याला पहायला मिळाली आहे. या दोघांनी ऑनफिल्ड उतरुन तातडीने मदत कार्यात सहभाग घेतला. याउलट आपल्या भागाचे विद्यमान खासदार परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर फलटण तालुक्यात प्रकट झाले’’, अशी खोचक टिका भाजपा फलटण तालुका अध्यक्ष अमित रणवरे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

‘‘पुणे येथे महत्त्वाच्या कामात असताना पूरसदृश्य परिस्थितीची माहिती मिळताच रणजितसिंह नाईक निंबाळकर आपले काम सोडून तात्काळ फलटणला आले. परिस्थिती हाताळताना त्यांनी जनता आणि अधिकार्‍यांच्यातला दुवा बनून काम केले व आत्ताही ते करत आहेत. पूर परिस्थिती निर्माण झाल्याच्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील काम करत होते. या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी तातडीने संपर्क साधत मदतीसाठी एन.डी.आर.एफ.च्या टीमलाही तालुक्यात पाचारण करण्यात आले होते’’, असेही अमित रणवरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

‘‘नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करण्याचे निर्देश रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी अधिकारी वर्गाला दिले आहेत. फलटण शहरातील पूरग्रस्तांना दोन वेळेची जेवणाची सोय व राहण्याची व्यवस्था रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामार्फत करण्यात आली आहे’’, असेही अमित रणवरे यांनी सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!