दैनिक स्थैर्य । दि.२३ मार्च २०२२ । सातारा । कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे दोन वर्षांत प्रथमच अत्यंत जल्लोषात शाहूनगरीने रंगपंचमीचा आनंद घेतला. बालगोपाळांनी एकमेकांना यथेच्छ रंगात भिजवून काढत पर्यावरण पूरक रंगांच्या माध्यमातून रंगपंचमी साजरी केली. साताऱ्यात दिवसभर रंगपंचमीचा अनोखा उल्हास पाहायला मिळाला.
कोरोना ची तिसरी लाट ओसरल्याने हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने पर्यावरण पूरक रंगपंचमी व धुळवड साजरी करावी असे सूचित केले होते त्याचा अनोखा उत्साह मंगळवारी साताऱ्यात पाहायला मिळाला . सकाळी नऊ वाजल्यापासूनच बच्चेकंपनी शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर रंग आणि पाण्याचे फुगे घेऊन वावरताना दिसत होती . एकीकडे जागतिक जलदिन साजरा होत असताना पाण्याची बचत व्हावी असा संदेश दिला जात असताना साताऱ्यातही पाण्याची फार नासाडी होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली . शाहूनगर येथे जय सोशल फाउंडेशन व उदयनराजे मित्र समूह यांच्यावतीने खास महिलांसाठी शाहूनगर येथील मैदानावर उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवात पर्यावरण पूरक रंगांचे मुक्त हस्ते वाटप करण्यात आले . महिलांनी या रंगोत्सवाचा आनंद घेतला जय सोशल फाउंडेशन च्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला . आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांनी सुद्धा येथील कला वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर रंगावली चे आयोजन केले होते . येथेही नागरिकांनी रंगपंचमीचा भरपूर आनंद लुटला महिला बच्चे कंपनी पुरुष मंडळी सगळ्यांनीच एकमेकांना रंग लावून निरोगी राहा आनंदी राहा असा शुभेच्छा संदेश दिला . साताऱ्यात रस्त्यारस्त्यांवर रंगपंचमीचा हा जल्लोष यंदा प्रथमच पाहायला मिळाला रंगपंचमीचे रंग आणि पिचकाऱ्या खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत खूप गर्दी होती यंदा मुलांनी पिचकाऱ्या ऐवजी पाण्याचे फुगे एकमेकांना मारून रंगपंचमी खेळण्याचा आनंद मनसोक्तपणे लुटला.