फलटणमध्ये रंगला आषाढी साहित्यिक संवाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२३ । फलटण । साहित्य माणसाला जगायला शिकवते, जगण्याचे बळ देते, त्यामुळे साहित्याचे जीवनात महत्त्वाचे स्थान आहे.हे स्थान टिकून साहित्यिक विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वन विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक संवाद या कार्यक्रमाचे आयोजन 27 जून रोजी फलटण येथील नाना नानी पार्क येथे करण्यात आले होते. गार गार वारा, पावसाच्या सरी, हिरवागार निसर्ग, पक्षांचा किलबिलाट यामध्ये साहित्यिक संवाद रंगला होता. कार्यक्रमाचे संयोजक माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत करून साहित्यिक संवादाची वाढती व्याप्ती, नव साहित्यिक व नव्या जुन्या साहित्यिकांचा सुसंवाद तसेच या साहित्यिक संवाद कार्यक्रमाचे वेगळेपण व मुक्त संवाद जपला तर स्वच्छंदी लिखाणातून नव प्रेरणा व ऊर्जा मिळेल व साहित्यिक घडतील असे सांगितले, तसेच फुले व पंढरीच्या पांडुरंगा या कविता सादर केल्या. . प्रा. विक्रम आपटे यांनी असा मी मराठी असामी या लेखातून मराठीतील एका शब्दाचे, एका वाक्याचे अनेक अर्थ व त्याचा परिणाम अन विपर्यास यावर मजेशीर भाष्य केले त्यामुळे हास्य कल्लोळ झाला अन कार्यक्रमात रंगत आली . उपस्थित कवींनी आषाढ, निसर्ग, वृक्षवेली, पाऊस, वृक्षारोपण व पंढरीची वारी अशा विविधांगी कविता सादर करून रसिकांची मने जिंकली, यामध्ये वनरक्षक, रानकवी राहुल निकम यांनी झाड व मैना, आशा दळवी यांनी पालखी व देणं फुलांचे, युवा कवी अविनाश चव्हाण यांनी तू असताना व काळीज फाटल्यावर, नव कवयित्री कु. दामिनी ठिगळे यांनी विरह व तु फक्त मनी ठेव या कविता सादर केल्या. मसाप फलटण शाखा कार्यवाह अमर शेंडे यांनी आभार मानले. यावेळी निसर्गप्रेमी सचिन जाधव, विजय काळोखे, मुख्याध्यापक भिवा जगताप, सौ स्मिता शेंडे, कृष्णात बोबडे, अनिरुद्ध बोबडे, कु. मुक्ता शेंडे, चारुदेष्ण बोबडे तसेच साहित्यप्रेमी, रसिक, नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!