
केंद्र सरकारच्या ‘न्यू इंडिया एश्योरन्स’ कंपनीत निंबळक (ता. फलटण) येथील रांचिका हनुमंत बनकर यांची ‘प्रशासकीय अधिकारी’ (AO) पदी निवड झाली आहे. या यशाबद्दल उद्योजक रामसाहेब निंबाळकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
स्थैर्य, निंबळक, दि. ११ एप्रिल : फलटण तालुक्यातील निंबळक येथील सुकन्या कु. रांचिका हनुमंत बनकर हिने आपल्या जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर एक मोठी गगनभरारी घेतली आहे. केंद्र सरकारच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड’ (NIACL) मध्ये तिची ‘प्रशासकीय अधिकारी’ (Administrative Officer – Accounts Specialist) या क्लास-वन पदावर दिमाखात निवड झाली आहे. तिच्या या घवघवीत यशाने निंबळक गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
रामसाहेब निंबाळकर यांच्या हस्ते विशेष सत्कार:
रांचिकाने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल निंबळक येथे तिचा यथोचित सत्कार करण्यात आला. सुप्रसिद्ध उद्योजक मा. श्री. रामसाहेब निंबाळकर यांच्या शुभहस्ते आणि निंबळक ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमान ओसंडून वाहत होता.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी यश:
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि प्रचंड अभ्यासाच्या जोरावर रांचिकाने मिळवलेले हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण निंबळक गावातील आणि ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी एक मोठे प्रेरणास्थान ठरेल, असे गौरवोद्गार यावेळी उपस्थित मान्यवरांनी काढले. आपल्या जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील मुलीही केंद्र सरकारच्या उच्च पदांपर्यंत पोहोचू शकतात, हे रांचिकाने सिद्ध करून दाखवले आहे.
रांचिकाच्या या यशाबद्दल तिच्यावर सध्या संपूर्ण फलटण तालुक्यातून आणि परिसरातून अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत आहे. या सत्कार सोहळ्याला अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार माजी पंचायत समिती सदस्य संजय कापसे यांनी मानले.

