रानभूली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 03 : १९९० चे दशक महाराष्ट्रात डोंगर भटक्यांच्या टोळ्या सहयाद्रीत भटकंती करत होत्या. हरीष कपाडिया यांचे ट्रेक द सहयाद्री प्र के घाणेकरांचे साद सह्यद्रीची भटकंती किल्ल्याची आनंद पाळंदे यांचे गिरीदुर्गांच्या पहाऱ्यातून सुनील राज यांचे जिद्द आणि गोनीदांचे दुर्ग भटकती वरील पुस्तक आणि शिवकाळावरील कादंबऱ्या अशा मोजक्याच साधनांचे वाचन. ट्रेकिंग संस्थेमार्फत गेलेल्या लोकांकडून दुर्गांची ऐकीव माहीती आणि त्यासोबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे निनाद बेडेकर अप्पा परब साबीरभाई शेख आणि इतर मान्यवरांची इतिहासावरील व्याख्याने अशी सांगड घालून दुर्ग भटके दुर्ग भटकांतीच्या त्रिवेणी संगमात न्हाऊन निघत होते त्याचवेळी आमच्या हातात गोनीदांचे दुर्ग हे पुस्तक लागलं. या आधी वाघरु रानभूली आणि इतर पाच शिवकालीन कादंबऱ्या वाचल्या होत्या. मनाला भिडल्या होत्या आयुष्य समृद्ध करून गेल्या होत्या. आम्हा दोघां भावांच्या मागे ना  कुठला क्लब ना संस्था नाही म्हणायला केव्ह एक्सपलोरर्स या संस्थबरोबर डुक्स नोज हा ट्रेक करून भटकंतीची श्रीगणेशा केली होती.

अप्पासाहेबांचे दुर्ग पुस्तक सॅकमध्ये टाकून सिहगड राजगड आणि तोरणा या ट्रेक ला निघालो. सिहगड बघून कल्याणदरवाजा उतरून राजगडच्या पायथ्याशी असलेल्या गावाकडे जाणारी डोंगर रांग पकडली आणि चोरदारवाजने राजगड सर केला. पद्मवतीच्या देवळात सॅक टाकून भटकंतीला निघालो. गड शांत होता गडावर चिटपाखरू नव्हते रात्रीचा मुक्काम असल्यामुळे संजीवनी माचीकडे निघालो. तसे आम्ही डोंगरात नवखे तरी पण पहिल्या परिक्षेकरिता निवडला हा खडतर ट्रेक. सोबत असलेली पुस्तक आमची गाईड डावीकडे बालेकिल्ला ठेवत आम्ही छोट्या पायवाटेने निघालो. वळणावळणाची पायवाट आणि अचानक एका वळणावर खांद्यावर बंदूक दाढी मिश्या वाढवलेली व्यक्ती आम्हाला सामोरे आली. आमच्या छातीचा ठोका चुकला ती व्यक्ती हसत हसत आमच्या जवळ आली. गड बघायला आलासा…कुठना पुना की मुंबई आम्ही म्हणालो मुंबई. घाबरू नका म्या भिकुले त्या तिथं आम्ही सगळे भिकुले राहतो. तुम्ही अप्पांना वळखता आम्ही म्हणालो आम्ही त्यांना ओळखत नाही पण त्यांची पुस्तक वाचलीय. मग राव तुम्ही वाघरु वाचलं असणार. त्या कादंबरीत जो बाबू भिकुल्या आहे त्याचा मी मुलगा. कादंबरीतील पात्राचा मुलगा आम्ही हरखून गेलो. जास्त जंगलात जाऊ नका पन घाबरू बी नका. आवं राजांचा गड आनी गडांचा राजा हाय ह्यो राजगड. येतो आणि झपझप पाऊले टाकत भिकुले जंगलात नाहीसा झाला. सुरुवातीलाच असा शुभ शकुन झाल्यामुळे आम्ही पुढील काही वर्षातच महाराष्ट्रातील बहुतेक दुर्गाना भेटी दिल्या आणि एके दिवशी कळलं की अप्पांच्या रानभुली कादंबरीतील नायिका मनी अवकिरकर रायगडाच्याच घेऱ्यात कुठे तरी राहते. मग ठरलं रानभूलीचा शोध घ्यायचा. पण योग काही येत नव्हता. वर्षातून शिवपुण्यतिथी शिवराजाभिषेक आणि एक दोन वेळा रायगडावर जाणे होत होते. ताकवाल्या मावशीकडुन रानभूलीच्या गावाचा पत्ता घेतला होता. तसा तो पायथ्यशी असलेल्या शेडगेनी पण दिला होता. पण भेटीची वेळ साधता येत नव्हती. मागील वर्षी मात्र रानभुलीला भेटण्याच्या इराद्याने रायगडाकडे निघालो. रानभूली उर्फ मनी अवकिरकरसाठी नऊवारी साडी मिठाई आणि इतर भेटवस्तू सोबत घेतल्या. आणि निघालो पाचाड न एक रस्ता सांदोशी मार्गे पालीला जातो. या मार्गावर पाचाडच्या पुढे काही अंतरावर एका धनगरवाडीत रानभूली रहात होती.

आम्ही त्या अंदाजाने एका धनगर वाडीत पोहोचलो आणि रानभूलीची चौकशी केली. या गावातील बायका ताक विकायला रायगडावर जात होत्या. पण त्यांना त्यांच्या कितीतरी वर्ष आधी रायगडवर वावरणारी आणि अप्पांना अनवट रायगड  शोधण्यास साथ देणारी निसर्गात रानात रमणारी मनी अवकिरकर त्यांना ठाऊक नव्हती. इथं मोबाईलची रेंज पण गायब झाली म्हणजे शेडगेला फोन करण्याचा प्रश्नच उरतं नव्हता. तसच पालीच्या दिशेनी निघालो. रायगडच्या मावशीने सांगितले होते मनीच्या घरासमोर फणसाच झाड आहे. वाटेतील अजून दोन तीन गावात चौकशी केली पण नकार आम्ही कंटाळून आणि हिरमुसले होऊन रानभुलीचा नाद सोडून दिला. पुढच्या वेळी पूर्ण पत्ता घेऊन येण्याचा चंग मनात बांधून पालीचा रस्ता धरला. डावीकडे दूर रायगड दिसत होता. एका वळणावर एका गावकऱ्याने लिफ्ट साठी हात दाखवला. गाडीत आधीच चार जण होती तरीपण गाडी थांबवली. त्याला विचारले कुठे जाणार तो म्हणाला पुढच्या वळणावर सोडा. तिथंच खाली दरीत माज गाव आहे. बसा पुढचं वळण आलं सगळे शांत तो उतरला आम्हाला धन्यवाद देत निघाला आणि एकाएकी मागे फिरला. आम्ही पण पाय मोकळे करायला खाली उतरलो होतो. पावन सगली मंडली महाड हुन मुंबईला जातात पन तुमी इथना कुठं निघाला. रस्ता चुकलात की काय आम्ही नाईलाजाने त्याला आमची कथा एकवली. तो हसला…या माझ्या मागना…त्याने मला एका छोट्या टेकाडावर नेलं… दूर बोट दाखवत म्हणाला ते बघा ते फणसाच झाड दिसतंय ना आनी त्याच्या समोर एक झोपडी तेच मनी अवकिरकरच घर. अप्पांच्या बुकातली रानभुली आम्ही अवाक झालो. त्याचे आभार मानून त्याचा निरोप घेतला. गाडी दामटवली एका दमात त्या घरासमोर पोहोचलो. गाडीचा आवाज ऐकून. घरातून एक ताठ कण्याची म्हातारी हसत हसत बाहेर आली मी मनी अवकिरकर अप्पांची रानभूली.

आज अप्पा उर्फ गोनीदांचा पुण्यस्मरण दिन…आमचं आयष्य  आपल्या साहीत्यांनी शिवकालमय समृद्ध आनंददायी करणाऱ्या दुर्गमहर्षीअप्पांना विनम्र अभिवादन…

संदीप शशिकांत विचारे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!