
आरोग्य शिबिर, महिलांसाठी स्पर्धा आणि विकासकामांचे लोकार्पण; निंबळक सुपुत्राचा समाजापुढे आदर्श.
स्थैर्य, फलटण, दि. २७ डिसेंबर : निंबळक (ता. फलटण) गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. रामसाहेब निंबाळकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत निंबाळकर यांनी समाजाभिमुख कार्यक्रम राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रामसाहेब निंबाळकर यांनी शिक्षणाप्रती असलेली आपली बांधिलकी जपली. त्यांनी जिल्हा परिषद केंद्र शाळा, निंबळक या शाळेला शैक्षणिक सुविधा उभारण्यासाठी तब्बल ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. त्यांच्या या दातृत्वामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होणार असून ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रामसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त निंबळक गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते:
-
विद्यार्थी सन्मान: विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
-
महिलांसाठी स्पर्धा: महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी आणि पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
-
आरोग्य शिबिर: ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर घेण्यात आले.
-
विकासकामांचे उद्घाटन: वाढदिवसाचे औचित्य साधून निंबळक गाव आणि परिसरातील विविध विकासकामांचे उद्घाटन समारंभ पार पडले.
या सोहळ्यासाठी महानुभाव मठाचे मठाधीपती श्री. नरेंद्र शास्त्री, सरपंच सौ. सीमा शिवाजी बनकर, ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद मेहता, मा. ना. त. श्री. नंदकुमार भोईटे, माजी पंचायत समिती सदस्य श्री. संजय कापसे, श्री. काशिराम मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. जयराम मोरे, श्री. शिवाजी पिसाळ, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिंदे मॅडम आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. वैभव निंबाळकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

