
दैनिक स्थैर्य | दि. ३ फेब्रुवारी २०२४ | पुणे |
माढा मतदारसंघात आमच्या खासदारकीत अभूतपूर्व अशी कामे झालेली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात रामराजेंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला तिकिट मिळाले तर त्यांनी गद्दारी करण्याची, आमचे तिकिट कट करण्याची भाषा केली आहे. हा प्रकार ते नेहमी करत असतात. माझे वडील हिंदूराव नाईक निंबाळकर हे १९९६ साली उभे राहिले असताना त्यावेळी त्यांनी विरोधात काम केले होते, मात्र माझे वडील त्यावेळी निवडून आले होते. त्यांना नेमके कशाचे दु:ख आहे, हे कळत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
आ. रामराजेंनी कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या टीकेला उत्तर देताना पुणे येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पत्रकारांशी बोलत होते.
खासदार रणजितसिंह म्हणाले की, राज्यात युतीचे सरकार आहे. रामराजे युतीत आहेत. त्यांना युतीचा फायदा हवा असतो, मात्र वेळ आली की ते गद्दारी करतात. माढा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे. ते भारतीय जनता पार्टीचे श्रेष्ठी कधी झाले? मुळातच राष्ट्रवादीमध्ये त्यांना काडीची किमत नाही. एवढे सगळे त्यांचे ज्युनिअर मंत्री होऊन गेले, मात्र यांना मंत्रीपद दिले गेले नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे त्यांच्याविषयी मत काय आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. स्वत:च्याच पक्षात त्यांना स्थान नाही आणि ते माझ्या पक्षाची भूमिका ठरवायला निघाले आहेत, हे आश्चर्य आहे.
खासदार रणजितसिंह पुढे म्हणाले की, आ. रामराजे नेहमीच माझ्यावर टीका करत असतात. हे तालुयाला नवे नाही. ते नेहमी माझ्याविरोधात तालुयात व माढा मतदारसंघात बोरीचा बार भरवत असतात. एकीकडे सुसंस्कृतपणा दाखवायचा, दुसरीकडे गुंडांना बरोबर घेऊन दहशतीचा वापर करायचा आणि तरीसुध्दा मी फलटण तालुयातील जेव्हा लिड घेतो, तेव्हा हे अपघाताने खासदार झाले असे म्हणायचे, ही त्यांची जुनीच परंपरा आहे.
रामराजेंचे माढा मतदारसंघात शून्य महत्त्व राहिले आहे. माझ्या विकासकामांचा परिणाम येणार्या लोकसभेनंतर त्यांच्या राजकारणावर व राजकीय कारकीर्दीवर झालेले दिसून येणार आहेत. ते जे म्हणतात की, आमची स्वराज डेअरी वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. ते चुकीचे आहे. कुणीही आमची डेअरी वाचवली नाही, असेही खासदार यांनी सांगितले.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो. मी परमेश्वर सोडले तर कुणाचेच पाय धरत नाही. अजितदादा हे महाराष्ट्रातील सन्माननीय नेते आहेत. वेगवेगळ्या कामांवर, राजकीय भूमिकांवर चर्चा करण्यासाठी आमची भेट होत राहते. मात्र, मी अजितदादांचे पाय धरतो, हे त्यांचे म्हणणे हे धादांत खोटे आहे. आ. रामराजे हे असे नेहमीच खोटे बोलत असतात, असा आरोपही खासदारांनी रामराजेंवर केला आहे.
माढा मतदारसंघातून उभे राहण्याबाबत बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. सध्या तरी मी माढा मतदारसंघात पक्षाचे काम करत आहे. मात्र, उद्या जर पक्षाने या मतदारसंघात नवीन चेहरा द्यायचे ठरविले तर मी पाठीमागेच सांगितले आहे की, पक्ष जो आदेश देईल, तो तंतोतंत पाळला जाईल. आणि माझे कार्यकर्तेही तो आदेश तंतोतंत पाळतील.
माढा मतदारसंघात मला वेगळी तयारी करण्याची गरज नाही. मी निवडून आल्यानंतर जनतेला दिलेले सर्व शब्द पाळले आहेत. त्यांची कामे केली आहेत. त्यामुळे वेगळ्या तयारीची मला गरज वाटत नाही. मला जर संधी मिळाली तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या मताधियाने निवडून येणार्या खासदारांमध्ये माझा समावेश असेल असे मी नकी सांगेन, असेही शेवटी खासदार रणजितसिंह यांनी म्हटले आहे.

