रामराजेंची माढ्यातून लोकसभेसाठी चाचपणी; विजयसिंह मोहिते – पाटील यांचे कायमच मार्गदर्शन : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२२ | फलटण | प्रसन्न रूद्रभटे | विधान परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढा लोकसभा मतदारसंघातून चाचपणी सुरू असल्याची चर्चा सध्या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. नुकतेच माढा लोकसभा मतदारसंघातील कारुंडे येथील चैतन्य जप प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये माजी खासदार विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या समवेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती दिसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, कारूंडे येथे होणाऱ्या चैतन्य जप प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आयोजकांच्या वतीने निमंत्रण देण्यात आलेले होते व त्यांचे निमंत्रण स्वीकारूनच तेथील उद्घाटन समारंभाला गेलेलो होतो. विजयसिंह मोहिते – पाटील यांचे कायमच मार्गदर्शन मला लाभत आलेले आहे. आगामी काळातील राजकीय वाटचालीसाठी सुद्धा विजयसिंह मोहिते – पाटील यांचे मार्गदर्शन मला नक्कीच मिळेल.

2009 साली माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली व प्रचंड मताने लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधून 2014 साली विजयसिंह मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातुन निवडून गेले व त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून भारतीय जनता पार्टी कडे गेले. त्यानंतर सन 2019 साली राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा पराभव करत भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले.

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघावर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सज्ज झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आगामी काळामध्ये माढा लोकसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा विचार केला जाऊ शकतो, अशी चर्चा माढा लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रमांना हजेरी तर लावत नाहीत ना ? असा सवाल सुद्धा राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आलेली होती. त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती दिसत आहे. यामुळे आता राज्याच्या राजकारणानंतर देशाच्या राजकारणामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर लवकरच दिसतील अशी चर्चा सध्या सुरू आहे.


Back to top button
Don`t copy text!