
दैनिक स्थैर्य | दि. 03 फेब्रुवारी 2024 | फलटण | विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी आता तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. त्यांचे वय झाले असून त्यांना जर मला शिव्या घालायच्या असतील तर मला बोलवावे जिथे बोलवाल तिथे येऊन शेजारी बसतो तुम्ही ज्या शिव्या घालाल त्या मी फुले म्हणून घ्यायला तयार आहे; असे स्पष्ट प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण येथील लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर वारकरी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की; आगामी काळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधून महायुतीच्या माध्यमातून जो कोणी उमेदवार असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील; त्याचे तंतोतंत पालन करणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
फलटण तालुक्याचे नेते रामराजे नाईक निंबाळकर ज्या शिक्षण संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत; त्याच शिक्षण संस्थेमध्ये माझे एसवाय पर्यंतचे शिक्षण झाले असून तिथेच टीवायचे ऍडमिशन सुद्धा माझे आहे. रामराजे साहेब हे अतिशय हुशार व्यक्तिमत्व असून त्यांच्या एवढे शिक्षण फलटणमध्ये नाही तर संपूर्ण राज्यामध्ये कोणाचेही नसेल; असे मत यावेळी खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केले.