स्थैर्य, फलटण दि. 20 : साखरवाडी (ता.फलटण) येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या तब्बल 132 कामगारांना पूर्ण वेतन वाढ देण्याचे कारखाना प्रशासनाने जाहीर केले असून याकामी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे. सदरची वेतनवाढ जाहीर झाल्यामुळे यासर्व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वांनी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा सत्कार करुन विशेष आभार मानले.
साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स लिमिटेड हा साखर कारखाना आर्थिक अडचणीत आल्यानंतर एन.सी.एल.टी. न्यायालयाच्या माध्यमातून सांगलीच्या श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हा कारखाना विकत घेतला. त्यानंतर ऊस उत्पादक शेतकर्यांची थकित बिले, कामगारांचे थकित वेतन अदा करुन गतवर्षीचा गळीत हंगाम कारखान्याने यशस्वी करुन दाखवला आहे. मागील दहा ते पंधरा वर्षापासून संकलित म्हणून तुटपुंज्या 6 ते 7 हजार रुपये मानधनावर काम करणार्या सुमारे 132 कामगारांच्या पूर्ण वेतनवाढीचा प्रश्न प्रलंबित होता. याकामी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व तात्यासाहेब काळे यांनी शिष्ठाई केल्यानंतर व्यवस्थापनाने कामगारांना पूर्ण वेतन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
भविष्यातही कारखान्याच्या माध्यमातून साखरवाडीला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी व परिसरात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी श्रीदत्त इंडिया मागे राहणार नाही, असे श्री दत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारु यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या बैठकीत प्रीती रुपारेल, परीक्षित रुपारेल कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजित जगताप, कामगार युनियनचे राजेंद्र भोसले, पोपट भोसले, गोरख भोसले, बाळासो भोसले, संजय जाधव, राजेंद्र गायकवाड, संतोष भोसले, महेश भोसले, निवृत्ती भोसले, महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मंडळ, फलटण तालुका साखर कामगार युनियन व सर्व कौन्सिल मेंबर उपस्थित होते.