‘ज्यांना जपले, त्यांनीच गद्दारी केली’; रामराजेंचा फलटणमध्ये एल्गार, दहशत संपवण्याचा दिला इशारा


‘मंगळवार पेठ आणि फलटणमधील दहशत आणि गुंडगिरी संपवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,’ असा सणसणीत इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला. वाचा सविस्तर बातमी.

स्थैर्य, फलटण, दि. 13 डिसेंबर : “गेली ३० वर्षे आम्ही ज्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, त्यांनीच गद्दारी केली. आता बास झाले; मंगळवार पेठ आणि फलटणमधील दहशत आणि गुंडगिरी संपवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. या निवडणुकीत विरोधकांना ‘समाप्त’ करणारच,” असा सणसणीत इशारा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला. फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार पेठ (प्रभाग क्रमांक २) येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

‘त्यांनी गद्दारी केली, आता फळ भोगतील’

रामराजे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “आम्ही ज्या घराला राजकीय संधी दिली, त्यांनी समाजावर अन्याय केला. आम्ही त्यांना सुधारण्याची संधी दिली, पण उपयोग झाला नाही. आता त्यांच्या पापाचा घडा भरला आहे.” यावेळी त्यांनी मंगळवार पेठेतील जागांचे मालकी हक्क नागरिकांना मिळवून देण्याचा शब्द दिला. “कोणीही दहशतीला घाबरू नका, मी अजूनही खंबीर आहे,” असे रामराजे यांनी स्पष्ट केले.

नगरपालिका हाच यांचा धंदा झालाय : रघुनाथराजे

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “या लोकांचा धंदाच नगरपालिका झाला आहे. बिल्डरांना धमकावणे, पैसे उकळणे आणि शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण करणे हेच यांचे काम आहे.” मंगळवार पेठेशी आपले जिव्हाळ्याचे नाते असून जिवंत असेपर्यंत या पेठेतील जागांचे मालकी हक्क विनामूल्य मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

आता ‘शिवसेना स्टाईल’ने उत्तर देणार

नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. “लोकांचा प्रतिसाद पाहता निवडून येण्याचे ‘पॉझिटिव्ह चान्सेस’ आहेत. आम्ही सुसंस्कृत आहोत, पण जर कोणी धमक्या देत असेल, तर आता ‘शिवसेना स्टाईल’ने उत्तर दिले जाईल. फलटणला पुन्हा चुकीच्या हातात देऊ नका, अन्यथा शहराचे वाटोळे होईल,” असे आवाहन त्यांनी केले.

धमकी दिली तर हयगय नाही

पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी मतदारांच्या सुरक्षेची ग्वाही दिली. “तुम्हाला आणि तुमच्या लेकीबाळींना जपण्याची जबाबदारी आमची आहे. कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर त्याला धडा शिकवू,” असे ते म्हणाले.

तर स्थानिक उमेदवार ॲड. अनिकेत अहिवळे यांनी, “आम्ही वकील आहोत, कायद्याने लढू आणि रस्त्यावरही उतरू. जर कोणाला धमकी दिली, तर त्याची हयगय केली जाणार नाही,” असे विरोधकांना ठणकावून सांगितले. या सभेला मंगळवार पेठेतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


Back to top button
Don`t copy text!