
“३० वर्षे आमच्या घरात राहून गद्दारी करणाऱ्यांना आणि एका आमदाराला गंडवणाऱ्या ‘कलाकारा’ला आता जनताच उत्तर देईल,” रामराजेंचा आसू येथील सभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल. पाणी प्रश्न आणि विकासावरून विरोधकांना सुनावले खडेबोल. वाचा सविस्तर…
स्थैर्य, फलटण, दि. १९ जानेवारी : “माझ्या ३० वर्षांच्या सत्तेचा हिशोब मागणारे स्वतः काय दिवे लावले, हे सांगत नाहीत. केवळ खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करणे आता चालणार नाही. ज्यांनी ३० वर्षे आमच्या घरात राहून आम्हालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, अशा ‘कलाकारां’ना आता जनताच त्यांची जागा दाखवेल,” असा घणाघात विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला. ते आसू (ता. फलटण) येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते.
‘त्या’ आमदाराला गंडवणारा ‘कलाकार’ तुमच्यात!
विरोधकांवर आणि बंडखोरांवर टीका करताना रामराजेंनी एका स्थानिक नेत्याचा उल्लेख करत उपरोधिक टोला लगावला. ते म्हणाले, “ज्यांनी ३० वर्षे आमच्याबरोबर राहून गद्दारी केली, ते आता आम्हालाच प्रश्न विचारत आहेत. एका आमदाराला गंडवणारा एक ‘माणूस’ (कलाकार) मी बघितला आहे. असे भन्नाट कलाकार आता तुमच्यात (विरोधकांच्या गटात) येऊन राहिले आहेत, हे तुमचं नशीब मोठं आहे. पण आता त्यांची ही कलाकारी चालणार नाही. जनतेला सगळं समजतंय, कोण कोणाला फसवतोय.”
पाण्याचा इतिहास माहित नसलेल्यांनी हिशोब मागू नये!
पाणी प्रश्नावर विरोधकांना आरसा दाखवताना रामराजे म्हणाले, “गेल्या ३० वर्षांत आम्ही काय केले असे विचारता? १५ इंच पावसाच्या या तालुक्यात निरा-देवघर आणि धोम-बलकवडीचे पाणी कुणी आणले? दुष्काळी भागाला पाणी देऊन नंदनवन करण्याचे काम आम्ही केले. मात्र, आज पाण्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जात आहे. ज्यांना पाण्याचे महत्त्व कळत नाही, त्यांनी निदान इतिहासाचा अभ्यास करावा. ब्रिटिशांच्या काळातही लोकांनी पाणी नाकारले होते, तेव्हा संस्थानाने कर माफ करून पाणी घ्यायला लावले होते. आज त्याच पाण्याचा हिशोब मागणारे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत आहेत.”
शांतता भंग करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही
फलटण तालुक्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा गंभीर आरोप रामराजेंनी केला. “आम्ही ३० वर्षांत कधीही दंगा होऊ दिला नाही किंवा जातीपातीचे राजकारण केले नाही. पण आता समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हे प्रकार थांबले नाहीत, तर जनताच त्यांना धडा शिकवेल,” असा इशारा त्यांनी दिला.
५ हजारांचे फोटो काढणारे नेते…
विकासाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, “साखरवाडी कारखाना बंद पडला असता, तर आज काय अवस्था झाली असती? पाणी नसते तर कारखाना उभा राहिला नसता. आज कारखानदारीच्या माध्यमातून हजारो हातांना काम मिळाले आहे. आम्ही कधीही पैशाचे राजकारण केले नाही. मात्र, आज ५-१० हजारांच्या मदतीचे फोटो काढून प्रसिद्धी मिळवणारे नेते तयार झाले आहेत, हे दुर्दैवी आहे.”
“मी ७७ वर्षांचा, पण लढणार!”
यावेळी बोलताना त्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीला धडा शिकवण्याचे आवाहन केले. “माझे वय ७७ वर्षे आहे. मला आता कोणतेही पद नको आहे. पण तालुक्याचे भवितव्य सुरक्षित राहावे आणि चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता जाऊ नये, यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन,” असे भावनिक आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
