श्रीमंत रामराजेंनी आयत्या पिठावर रेघोटे ओढणे थांबवावे: खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि. 20 : तीस वर्षे तालुक्याची सत्ता उपभोगत असताना आजवर श्रीमंत रामराजे तालुक्यासाठी काहीच भरघोस काम करु शकले नाहीत. मी खासदार झाल्यावर अवघ्या तीस दिवसात रेल्वे, निरा – देवधर, एम.आय.डी.सी., रस्ते आदी विकासकामे मंजूर करुन घेतली. मात्र या कामांमध्ये कायमच खो घालण्याचे काम ना. श्रीमंत रामराजेंनी केलेले आहे. त्यांनी नुकताच जाहीर केलेला आदर्की – फलटण रस्ता मी मंजूर करुन आणलेला आहे. दुसर्याने केलेल्या कामांचे श्रेय घेऊन रामराजेंना अशा पद्धतीने आयत्या पिठावर रेघोटे ओढण्याची सवय पहिल्यापासूनच आहे. ती सवय त्यांनी आता तरी थांबवावी, अशा शब्दात माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली.

सुरवडी ता. फलटण येथील हॉटेल निसर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी व दिशा कमिटी सदस्य विश्‍वासराव भोसले, माजी पंचायत समिती सदस्य व युवा नेते धनंजय साळुंखे-पाटील, नगरसेवक अशोक जाधव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण शहराचे युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, बजरंग गावडे उपस्थित होते.

फलटण ते आदर्की फाटा रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच मंजूर

श्रीमंत रामराजे सांगत असलेला फलटण – आदर्की हा रस्ता खरं तर मी मंजूर करुन आणला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केलेला होता. याबाबतचे सविस्तर पुरावे माझ्याकडे असून मी केलेल्या मागणीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते, म्हणूनच फलटण ते आदर्की फाटा हा सिमेंट कॉंक्रिटचा होत आहे, असेही या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

नाईकबोमवाडीची एमआयडीसीची न होऊ देण्यात श्रीमंत रामराजेंचाच हात

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे असताना फलटण तालुक्यामध्ये नाईकबोमवाडी येथे दुसरी एमआयडीसी मंजूर करून आणली व पुढील कार्यवाहीसाठी योग्य त्या सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित विभागाला दिल्या होत्या. परंतु तालुक्यामध्ये नाईकबोमवाडी येथे दुसरी एमआयडीसीची न होऊ देण्याचे काम कायमच श्रीमंत रामराजे करीत आलेले आहेत, असा आरोपही खासदार रणजितसिंह यांनी या वेळी लगावला.

फलटण ते बारामती रेल्वे मार्ग होऊ नये म्हणून खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रीमंत रामराजेंचच मार्गदर्शन

फलटण ते बारामती रेल्वे मार्ग होऊ नये म्हणून खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रीमंत रामराजे हे कायमच मार्गदर्शन करीत असतात. फलटण ते बारामती हा रेल्वे मार्ग करू नये म्हणून श्रीमंत रामराजे यांनी आजपर्यंत खूप प्रयत्न केले परंतु मी खासदार झाल्यानंतर फलटण ते बारामती रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करून यामध्ये तोडगा काढण्यामध्ये यश आलेले आहे. आगामी काही दिवसातच फलटण ते बारामती रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल, अशी ग्वाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

लाल दिवा टिकण्यासाठी कायमच बारामतीकरांची लाचारी

1991 पासून फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून फलटणच्या जनतेने रामराजे यांना संधी दिली. परंतु रामराजे यांनी फलटणच्या कधीही विचार न करता आपला लाल दिवा टिकण्यासाठी कायमच बारामतीकरांची लाचारी स्वीकारली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आपल्या हक्काचे नीरा देवधरचे पाणी पुन्हा बारामतीला वळवण्यात सध्याच्या सरकारला यश आलेले आहे. परंतु आगामी काळामध्ये नीरा देवधरचे पाणी पुन्हा आपल्या तालुक्याचा मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

दत्त इंडिया कंपनीमध्ये श्रीमंत रामराजे पार्टनर

न्यू फलटण शुगर वर्क्स हा साखर कारखाना कवडीमोल भावामध्ये दत्त इंडिया कंपनीला विकून श्रीमंत रामराजे यांनी मिळवले काय ? असा सवालही उपस्थित राहतो. दत्त इंडिया कंपनीमध्ये श्रीमंत रामराजेच पार्टनर आहेत. फलटण तालुक्यामध्ये सुरू होत असणारे व्यवसाय टिकले पाहिजे दत्त इंडियावाले कारखाना व्यवस्थित चालवत असून व्यवसाय चालू ठेवण्यासाठी जी काही मदत लागेल ती सर्व आमच्याकडूनही केली जाईल. परंतु पूर्वीचे शेतकऱ्यांचे पैसे थकलेले आहेत. ते पैसे दत्त इंडियाच्या प्रशासनाला द्यावेच लागतील, त्यासाठी काहीही करण्याची तयारी सुद्धा शेतकर्‍यांच्या वतीने आम्ही ठेवलेली आहे, असेही यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

जनतेचा पैसा नक्की कोणाकडे व कसा व जातो हे बाहेर काढण्यास भाग पाडू नका

फलटण तालुक्यामध्ये विविध विकास कामे ही काही ठराविक कंत्राटदाराकडून केली जातात. त्या विकासकामांबद्दल बहुतांशी कामे ही काही ठराविक ठेकेदारांच्या माध्यमातून केली जातात. ठराविक ठेकेदारांच्या माध्यमातून जनतेचा पैसा नक्की कोणाकडे व कसा व जातो हे बाहेर काढण्यास भाग पाडू नका, असा इशाराही या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या वेळी दिला.

30 मार्च रोजी फलटण – पुणे रेल्वे सेवेचा शुभारंभ; विकासकामांबरोबरच तालुक्यासाठी इतर 76 कोटीचा निधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने येत्या 30 मार्च रोजी फलटण – पुणे रेल्वे सेवेचा शुभारंभ होत आहे. आपण पाण्यासाठी संघर्ष केला म्हणून बारामतीला जाणारे 65% पाणी आता फलटणला मिळत आहे. रेल्वे, निरा – देवधर, एम.आय.डी.सी., रस्ते आदी विकासकामांबरोबरच तालुक्यासाठी एका वर्षात 76 कोटीचा निधी आपण आणलेला आहे. आगामी काळात फलटणचे विमानतळ विमानसुविधेसाठी कार्यरत करण्याचा आपला मानस असल्याचेही यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!