दैनिक स्थैर्य | दि. 10 मे 2023 | फलटण | काल मंगळवार, दि. ९ मे रोजी माझ्या वयाच्या पंचाहत्तरीनिमीत्त फलटण तसेच इतर तालुक्यांच्या वतीने माझा जो काही सन्मान आणि सत्कार करण्यात आला. या आपल्या प्रेमामुळे मी अक्षरशः भारावून गेलो आहे. नाईक- निंबाळकर घराण्यात माझा जन्म झाला आणि या वैभवशाली इतिहासाची परंपरा अविरत चालू ठेवण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न केले. तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादाने महाराष्ट्राच्या राजकारण मानाच्या पदावर काम करण्याची संधी मला मिळाली. या संपन्न झालेल्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते ना. अजितदादा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या; याबद्दल त्यांचेही, मी मनापासून आभार मानतो असे मत विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले कि, गेली ३० – ३५ वर्षाच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत आपण जे प्रेम दिले, यातूनच मला या वाटचालीस बळ मिळाले. यादम्यानच्या काळात पाठबंधारे खाते, शेती, सहकार, शिक्षण, कला आणि क्रीडा या आणि अशा अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. या सर्व पदावर काम करत असताना दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन निर्णायक भूमिका बजावली. काल या कार्यक्रमाला आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिलेल्या शुभेच्छा मी मनापासून स्वीकारतो. आपले हे प्रेम आणि आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहावेत, ही ईश्वरचरणी इच्छा व्यक्त करतो.