शेतमजुरांनाही ‘पीएम किसान’चा लाभ मिळावा; आमदार रामराजेंची कृषीमंत्र्यांकडे आग्रही मागणी


स्थैर्य, फलटण, दि. 2 ऑक्टोबर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ जमीनधारक शेतकऱ्यांप्रमाणेच भूमिहीन शेतमजुरांनाही मिळावा, अशी आग्रही मागणी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या एका बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडली.

या बैठकीत बोलताना आमदार रामराजे म्हणाले, “शेतमजूर हे शेती व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा आर्थिक लाभ मिळाला, तरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने बळकटी मिळेल. या मुद्द्यावर मी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे.”

आमदार रामराजे यांनी मांडलेल्या भूमिकेची कृषीमंत्री भरणे यांनी दखल घेतली. ते म्हणाले, “रामराजे यांनी मांडलेल्या सूचना आम्ही स्वीकारत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस पावले उचलण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.” या योजनेचा विस्तार करण्यासाठी केंद्रासोबत समन्वय साधण्यात येईल, तसेच पिकांच्या बियाण्यांपासून ते विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी-व्यापार विभागाची एक संयुक्त टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

या बैठकीत कृषी विभागाचे अधिकारी आणि विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. फलटण तालुक्याच्या विकासाबरोबरच राज्यस्तरीय धोरणांमध्ये आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या या भूमिकेचे शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे.


Back to top button
Don`t copy text!