दैनिक स्थैर्य । दि. ०२ मे २०२२ । फलटण । फलटण शहर व तालुक्यात परंपरेप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा होत असतो. महापुरुषांना अभिवादन करताना राजकारण विरहीत, गट – तट, जात – पात बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येण्याच्या भावनेतून या भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या उत्सवात फलटण शहर व तालुकावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. या भव्य – दिव्य मिरवणुकीचा शुभारंभ विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते महात्मा फुले चौक येथे संपन्न झाला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार वैशाख शुद्ध द्वितीयेला फलटणला शहर व तालुक्यात साजरी करण्याची परंपरा आहे. यंदा हा शिवजयंतीचा उत्सव आज सोमवार, दिनांक 2 मे 2022 रोजी संपन्न झाला. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती विक्रमसिंहराजे भोसले यांच्यासह फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व सर्व पक्षाचे कार्यकर्त्यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
फलटणचे माजी नगराध्यक्ष स्व.नंदकुमार भोईटे यांच्या पुढाकारातून यापूर्वी अशी एकत्रित शिवजयंती साजरी करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थितीमुळे या उत्सवाला खंड पडला. तीच परंपरा पुढे सुरु ठेवून फलटण शहर व तालुक्यातील सर्व सार्वजनिक मंडळे, कार्यकर्ते व नागरिकांना एकत्रित घेवून शिवजयंती साजरी व्हावी व एकीचा संदेश सर्वत्र त्याच्या भूमिकेचे शिवजयंती उत्सव समितीने दक्षता घेतलेली होती.
आज सायंकाळी 5.30 वाजता श्रीमंत मालोजीराजे पुतळा परिसर येथून विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक पोवाडा, गझी नृत्य, सनई, चौघडे, संबळ, लेझीम, तुतारी अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात विविध चित्ररथांसह मार्गस्थ झाली. महात्मा फुले चौक, गजानन चौक, शंकर मार्केट, शुक्रवार पेठ, उंब्रेश्वर चौक (मलठण), पाचबत्ती चौक, बारामती चौक या मार्गाने मिरवणूकीचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप होईल.