
दैनिक स्थैर्य | दि. ०३ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
खरं तर रमेशकाका नात्याने माझे दीर लागतात. पण, आमचे हे नाते कधीच नव्हते. ते मला बहीण मानायचे आणि खरोखरच हे नातं त्यांनी शेवटपर्यंत जपलं. हो माझ्या प्रत्येक संकटाच्या काळात खरोखरंच ते कृष्णासारखं माझ्या पाठीशी उभे राहायचे. त्यामुळे त्यांना खूप मोठा आधार वाटायचा. तोच आधार ढासळला.
ईश्वरी इच्छेपुढे आपले काहीच चालत नाही, हे खरे आहे. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्याशिवाय हातात काहीच उरले नाही. त्यांची स्वामींवर गाढ श्रद्धा होती. याचं प्रत्यंतर आम्हाला वेळोवेळी येत होतं.
त्यांनी जमवलेली, जपलेली माणसे हीच त्यांची श्रीमंती होती. दासबोधातील नरदेह निरूपण समासात सांगितल्याप्रमाणे त्यांनी नरदेहाचे सार्थक केले. ते स्वत:साठी स्वत:च्या कुटुंबासाठी कधीच जगले नाहीत.
‘मरावे परी कीर्तीरूपी उरावे’ या उक्तीप्रमाणे ते जीवन जगले. याचा अनुभव आम्हा सर्वांनाच आला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचा रोजचा फुलवाला, रिक्षावाला ते गॅस सिलिंडर देणार्यापासून ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच पंचायत समिती अध्यक्ष विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली.
त्यांचा अजून एक गुण म्हणजे टापटीप आणि नीटनेटकेपणा. घरातून बाहेर पडताना ते कधीच इस्त्रीचे कपडे घातल्याशिवाय घराबाहेर पडले नाहीत. नीटनेटकेपणाचा गुण त्यांनी शेवटपर्यंत जपला.
त्यांची स्वामींवरील गाढ श्रद्धा, टापटीपपणा त्यांनी जपलेला, प्रचंड जनसमुदाय हे त्यांचे गुण आपण आचरणात आणूया, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
आम्ही सर्व मुजुमदार कुटुंबिय त्यांचे सदैव ऋणी राहू.
‘जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला’.
-सौ. उमा संतोष मुजुमदार
नारळीबाग, फलटण