चांगल्या कर्माच फळ टनाने देतं ते फलटण. अश्या नगरीत सालाबाद प्रमाणे मार्गशीर्ष मासारंभ अर्थात देव दीपावली या शुभ तिथीवर प्रभु रामचंद्र यांची यात्रा ही भाविक भक्तांची ऊर्जास्त्र आहे. दीपवाली पर्वानतंर बरोबर एक मासाने पारंपरिक रथोत्सव सुरु होतो. प्राचीन पुरातन आखीव रेखीव भव्य दिव्य मंदिर पाहताच आपले चित्त एकाग्र होत. खरंच भगवंताचा रमणीय दरबार, सेवक, दगडी कासव, जणू लिनतेच प्रतिक, भक्कम कोरीव दगडी घडीव दरवाजा. चौकटीला गणरायाची प्रतिमा, उंबऱ्यावर दैत्य जणू रामराया हेच सूचित करतात की, भगवंताच्या दर्शनाला येताना गणराया सह या अन् दैत्यरुपी विचार तिथंच समर्पित करा. आत भगवंताचा गाभारा प्रवेश करताच आपल्यातील मी पणाची बोळवण होऊन आपण भगवंताशी एकरुप होऊन जातो. भगवंताचे रुप किती पाहवं, न्याहाळावं होऊन जातं. मुखातून रामनामाच जप सुरु होता. कळत नकळत आपण मी पणाची आसक्ती सोडून भगवंताशी जोडले जातो.
समोर प्रभू रामराया, पतिव्रता सीतामाई, सावलीचा बंधू लक्ष्मण, सेवा दास मारुती यांचे हात जोडून अज्ञेच्या भूमिकेतून दिसतात.
भगवंताच हे नयन मनोहर रुपडं बघून आपणाला जणू हेच सांगावे वाटते. एक वचनी, एक बाणी, एक तत्त्वी, एक पत्नी यांचे आज्ञापालन यांचे जीवनात आचरण हाच रामारायाचा सांगावा आहे. धर्मपत्नी सीतामाई यांचे पतीबरोबरच सहजीवन, चढउताराचे हिंदोळे, सुख दुःखाचा फेरा तरीही संयमाचे प्रतिक आपणाला हेच सूचित करते की, आपल्या सहजीवनात तडजोड, समजूतदारपणा, सबुरीने घ्यावं सगळं व्यवस्थित होईल. आपले सतत लक्ष मनाकडे ठेवणं हाच लक्ष्मण बंधूचा ठेवा जपावा. आपणही मर्यादा पालन करुन, ज्येष्ठांचा मानसन्मान करावं अन् रेषा आखून न घेता रेषेत रहावं. लक्ष्मण रेषा ही प्रगतीची, उन्नतीची असावी. सेवा अन् दास्यत्व हे मारूतीराया सारखं एकनिष्ठ असावं. निष्ठेच फळ निश्चितच सुयोग्य भेटते. सेवा परमो धर्म या उक्ती प्रमाणे आपण ही जमलं तशी सेवा निरपेक्ष भावनेनी करावी.
पूजा अर्चा, भजन कीर्तन, नामस्मरणात पारंपारिक सागवानी कोरीव लाकडी रथात भगवंताचे पंचायतन विराजमन होते. सारे भाविक भक्त रामनामाचा गजर करीत बेलफुलांची मुक्त हस्ते उधळण करुन नतमस्तक होऊन तल्लीन होतात. रथावर मानकरी, सेवेकरी यांची सेवा. वाद्यांचा मंजुळ स्वर, सनई चौघड्यांची मांदियाळी, भाविक भक्तांची दर्शनाची लगबग, दारासमोरं सडा, सुबक नात्या नात्यातील ठिपक्यांची जोडणारी रांगोळी, विविध आकाराची, रंगाची, सुगंधाची फु सुमन पुष्पांची गुंफण जणू आपणाला एकतेच दर्शन घडवते. चौका चौकात खेळणी, पेढे प्रसादाची थाटलेली दुकाने. बारा मासाच बळ देणारी रामयात्रा उत्साही वातावरणात संपन्न होते.
रामरथ हे प्रपंच व परमार्थ यांचे प्रतिक आहे. आज्ञापालन, आदर्श, बंधूसेवा, दास्यत्व, एकता ही पंचसूत्री हेच सूचित करते की, मातापिता सेवा, अपत्य संगोपन, कुटुंब प्रबोधन, कर्तव्य पालन, जबाबदारीचे भान रामयात्रा सांगत राहते.
रामरथ यात्रा शीर्ष मार्गावर आणण्याचे योग्य स्थळ आहे. रामनाम घ्यावं. भजन, पूजन, श्रवण यासह नित्यनेमाने वाचन हवे. राम राम करीत आपले नित्य कार्य करावं. अडले नडले यांची सेवा. आपण समाज्याचं देणं आहोत हे ध्यानात ठेवणे. मुखात गोडवा हवा. रामराया आपणाला काहीच कमी पडू देणार नाही. रामराया रोज आपणाला विविध भूमिकेतून भेटतात. आपण फक्त प्रत्येकातील रामाला ओळखून राम राम करावा. देऊळ बंद असताना सुद्धा रामराया समाज्यात विविध प्रकारे सेवेत दंग होताना दिसतं होता.
याही वरसी रामराया रथयात्रा कोविडमुळे होणार नाही. आपण आपल्या घरीच अंतकरणातील रामरायाला स्मरुन जीवन रथाचे चाकं फिरती ठेऊ या. मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर, वारंवार हात स्वच्छ करणं हीच खरी रामसेवा आहे.
श्रीराम जयराम जय जय राम…. बोला प्रभू रामचंद्र की जय….
– प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१