सत्तेशिवाय ते जगू शकत नाहीत; भाजपमध्ये घेण्यासाठी ते फडणवीसांना रोज भेटत असल्याचा केला गौप्यस्फोट; विडणीत जयकुमार गोरेंचा घणाघात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘‘शिंदेची शिवसेना आणि भाजपची राज्यात सत्ता आल्यावर भाजपमध्ये घेण्यासाठी रोज ते देवेंद्र फडणवीसांना भेटत होते. सत्तेशिवाय हा माणूस जिवंत राहू शकत नाही. भाजपनी घेतलं नाही आणि निष्ठा नावाचा अंश नसल्याने ज्या शरद पवारांनी एवढं दिलं त्यांना त्यांनी सोडलं आणि अजितदादांसोबत महायुतीत गेले. लोकसभेला वारं फिरलं की महाराजसाहेबांची वारी तुतारीकडं जायला लागली. पण जसा हरियाणाचा निकाल लागला की ते अर्धे अजितदादांकडे आणि अर्धे शरद पवारांकडे राहिले. जिल्ह्यातले सर्वात भित्रे आणि गोंधळलेले राजकारणी रामराजे आहेत’’, असा घणाघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला.

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ विडणी (ता.फलटण) येथे आयोजित जाहीर सभेत आमदार जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, निवृत्त सनदी अधिकारी विश्‍वासराव भोसले आदींची उपस्थिती होती.

‘‘गेल्या अनेक वर्षांपासून फलटण तालुक्यात लोकशाही संपलेली होती. लोकशाहीचा गळा घोटून, मी करेल तो कायदा अशी भूमिका घेवून कुणाच्याही मताला त्यांनी मान दिला नाही. जो माणूस 19 वर्षे मंत्री होता, विधानपरिषदेत सभापती होता; त्यांनी ठरवलं असतं तर फलटण – कोरेगांवमधलं एकही काम शिल्लक राहिलं नसतं. स्वत:चं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी फलटणकरांच्या हक्काचं पाणी इमाने इतबारे बारामतीला त्यांनी दिलं. जो खासदार या भागात पाणी, रेल्वे, एमआयडीसी आली पाहिजे यासाठी लढत होता. बारामतीला दिलेलं पाणी परत फलटणला आणत होता त्या इथल्या सुपुत्राचा पराभव करण्याचं पाप त्यांनी केल आहे’’, असा आरोपही आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी केला.

‘‘समाजासमाजामध्ये भांडणं लावण्याची काम त्यांनी केलं आहे. कोणत्याही समाजाचा सन्मान त्यांनी केलेला नाही. जे तुम्हाला मुजरा घालतात ते तुमचे, जे घालत नाहीत ते तुमचे नाहीत अशा भूमिका घेवून इथे लोकशाहीचा अंत झाला आहे. खरं तर भाकरी करपायच्या आत बदलली पाहिजे. पण इथं भाकरी करपून पार राखरांगोळी झालीय. तालुक्यातल्या जनतेच्या सन्मानासाठी आता भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. ही निवडणूक तालुक्याची आमदार ठरवण्याची आहे. या तालुक्यातली लोकशाही पुन्हा जिवंत करण्याची आहे’’, असेही आमदार गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘‘जयकुमार गोरेनी जिल्ह्याचं वाटोळं केल्याचा आरोप ते करतात. मला राजघराण्याची, राजकारणाची पार्श्‍वभूमी नाही, शेतकरी कुटूंबातून मी आलोय, माझ्या पाठीशी लोक उभी राहू लागली आणि त्यांच्या साम्राज्याला धोका निर्माण झाला म्हणून ते माझा द्वेष करत आहेत. रणजितदादा पाणी, रेल्वे, एमआयडीसी आणण्यासाठी लढत आहेत आणि ते या गोष्टी घालवण्यासाठी लढत आहेत. त्यामुळे कुणाला साथ द्यायची हा निर्णय तुम्ही घ्या’’, असेही आमदार गोरे यावेळी म्हणाले.

‘‘इथलं आमदार कोण आहे हे कुणाला माहिती नाही. आमदारांना त्यांना विचारल्याशिवाय बारशाला जायची सुद्धा परवानगी नाही. स्वत:चं लेटरपॅड छापायचा सुद्धा त्यांना अधिकार नाही. त्याला कधी आमदारकीचा वापर करुन दिला नाही आणि भविष्यातही ते करून देणार नाहीत. फलटण तालुक्याचा गहाण टाकलेला स्वाभिमान पुन्हा सन्मानाने आणण्यासाठी विधानसभेला आपल्याला परितर्वन करावं लागेल. रणजितदादा मातीशी इमानदार आहेत. मी तर माण तालुक्यातून विधानसभेत जाणारच आहे पण येत्या 20 तारखेला तुम्ही फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातून सचिन पाटील यांना विजयी करा आणि माझ्यासोबत विधानसभेत पाठवा’’, असे आवाहनही आमदार जयकुमार गोरे यांनी मतदारांना केले.


Back to top button
Don`t copy text!