दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२२ । फलटण । हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गापैकी शिर्डी पर्यंतच्या सुमारे ३०/३५ कि. मी. अंतरामधील रस्त्याचे कामांसह विशेषतः गोदावरी नदीवरील मोठा पूल आणि रेल्वे ओव्हर ब्रीज सह या मार्गावरील अन्य छोटे मोठे पुलांची कामे बिनचूक, वेळेवर आणि दर्जेदार केल्याबद्दल ॲप्रीशिएशन सर्टिफिकेट सन्मानपूर्वक प्रदान करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे राम निंबाळकर यांचा विशेष गौरव केला. यावेळी एमएमआरडीएचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते.
नागपूर ते मुंबई या हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गापैकी नागपूर ते शिर्डी या ५२० कि. मी. अंतराचे काम पूर्ण झाले असून उप मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्र्यांसमवेत रस्त्याच्या कामाची पाहणी करताना या महामार्गावरुन प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव घेत समाधान व्यक्त केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि. ११ रोजी या महामार्गाचे उदघाटन केले आहे.
राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने (एमएमआरडीए) मोठ्या विश्वासाने कंपनीवर सोपविलेली जबाबदारी अत्यंत कौशल्याने वेळेत पूर्ण केल्याचे नमूद करताना या कंपनीच्या पूर्वीच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊनच त्यांना ही जबाबदारी देण्यात आली ती त्यांनी वेळेत पूर्ण केल्याचे नमूद करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही
राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे राम निंबाळकर व त्यांचे सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने आतापर्यंत स्वीकारलेले रस्ते, पूल व तत्सम कामे आणि जलसंपदा विभागाच्या माध्यमातून स्वीकारलेली कालव्याची कामे नेहमीच दर्जेदार व वेळेत पूर्ण करुन आपला नावलौकिक कायम जपला असून त्यामागे राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक राम निंबाळकर यांचे व्यवसायातील प्रामाणिकपणा जपण्याचे धोरण उपयुक्त ठरल्याचे नेहमीच मान्य करावे लागते.
नागपूर ते ठाणे (मुंबई) हा हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग ७०१ कि. मी. लांबीचा ६ पदरी महामार्ग असून त्यासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गावरुन ताशी १५० कि. मी. वेगाने प्रवास करणे शक्य असून नागपूर ते मुंबई हे अंतर अवघ्या ८ तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे. या महामार्गावर एकूण ३६ टोल नाकी उभारण्यात येणार असून या टोल नाक्यांद्वारे विविध प्रकारच्या वाहनांसाठी प्रती कि. मी. १.७३ ते ११.१७ रुपये इतका टोल आकारण्यात येणार आहे.
रविवार दि. ११ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महामार्गापैकी नागपूर ते शिर्डी या ५२० कि. मी. अंतरातील पूर्ण झालेल्या महामार्गाचे आणि टोल नाक्यांचे उदघाटन व लोकार्पण केले असून त्या नंतर लगेच हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.