
दैनिक स्थैर्य । 7 एप्रिल 2025। सातारा । प्रतिवर्षाप्रमाणे चैत्रशुद्ध नवमीला मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र यांची जन्मतिथी अर्थात जयंती ’जय श्रीराम.. जय श्रीराम..’ च्या घोषणा देत जिल्ह्यात रविवारी मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यापासून सुरू असलेल्या नऊ दिवसाच्या श्रीराम नवरात्री उत्सवाची सांगता आहे. आज रामनवमीला सातारा शहरातील विविध मंदिरात साजरी झाली. सातारा येथे श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळेत सुरू असलेल्या नऊ दिवसीय श्री राम महायज्ञाची सांगता दुपारी रामनवमीला पूर्णाहुतीने वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर जन्मकाळाचे कीर्तन सादर करण्यात आले. त्यानंतर पारंपारिक नऊवारी साडीतील महिलांनी पाळण्यात ठेवलेल्या श्रीरामाला जोजवून अंगाई गीते म्हटली सायंकाळी यज्ञस्थळापासून सातारा शहरात भव्य शोभायात्रा काढून आनंद लुटला.
सातारा शहरातील मंगळवार पेठ येथील श्री काळाराम मंदिर प्रतापगंज पेठेतील श्रीगोरा राम मंदिर, शनिवार पेठ येथील श्री शहाराम मंदिर, समर्थ मंदिर परिसरातील श्री. दामले राम मंदिर तसेच शाहपुरी गेंडामाळ येथील पाटील परिवाराच्या श्री शांत राम अर्थात राम ध्यान मंदिरातही राम जन्मानिमित्त विशेष फुलांची सजावट तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बारा वाजता मंदिरांमध्ये गुलाल व पुष्पवृष्टी करून श्रीरामाचा जन्मोत्सव महिलांनी पाळण्यामध्ये श्रीफळ रुपी श्रीरामाला जोजवून पाळणा गीते म्हणून साजरा केला. यावेळी ’श्री राम जय राम जय जय रामचा जय’ जयकार करून रामभक्तांनी आनंद लुटला. त्यानंतर महाआरती झाल्यावर सुंठवडा व प्रसाद वितरण करण्यात आला.
प्रतापगंजपेठेतील श्री गोराराम मंदिरात रामभक्तांनी पंचधातूच्या राममूर्तीची मंदिर परिसरात पालखीतून मिरवणूक काढून आनंद लुटला. श्री क्षेत्र सज्जनगड येथे रामनवमी निमित्त विशेष पूजा तसेच पवमान पंचसूक्तचा अभिषेक श्रीराम मूर्तीला घालण्यात आला. समर्थ रामदास स्वामींचा जन्म श्रीराम नवमीला झाल्याने सज्जनगड येथील मंदिरात जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामनामाची महती संपूर्ण जगाला पटवून देणार्या श्रीक्षेत्र गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर संस्थांनमध्येही रामनवमीचा विशेष उत्साह दिसून येत होता. गोंदवले येथील श्री थोरले राम मंदिर व धाकटे राम मंदिरात विशेष सजावट करण्यात आली होती. थोरले राम मंदिरात सुवासिक गजर्यांनी संपूर्ण गाभारा सुशोभित करण्यात आला होता. ही लक्षवेधी आकर्षक सजावट पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रामभक्तांनी गर्दी केली होती.
रक्तदान शिबिरात शेकडो युवक युवतींनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमही मोठ्या उत्साहात संपन्न केला. दुपारी जन्म काळाचे कीर्तन झाल्यावर भक्तांनी रामनामाचा जयघोष करत गुलाल, फुले उधळली. अनेक मंदिरातून यानिमित्त महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.