राम-लखन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


माझ्या माहिती प्रमाणे दीड दशकापूर्वी चित्रपटस्रुष्टीतील राम-लखन, करण-अर्जून या चित्रपटांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले होते. लोकप्रियतेचे शिखर गाठून गल्ला जमा केला. दोन सख्या भावांची कहाणी असलेले हे चित्रपट बाँक्स आँफिसवर धुमाकूळ घालून गेले. प्रत्यक्षात सख्खे नसले तरी चित्रपटात मात्र सख्या भावाची भूमिका साकारणाऱ्या भावांनी आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली त्यामुळे अनेकांनी हे चित्रपट डोक्यावर घेतले. क्षेत्र वेगळे असले तरी कुस्तीच्या आखाड्यात देखील आज पाटोद्याच्या आवारे बंधुनी असाच धुमाकूळ घातला आहे. पाटोदा व्हाया पुणे मार्गे जागतिक पदकाला गवसणी घालणारा पोलीस उपाधिक्षक राहुल आवारे आणि लाल मातीच्या मैदानात आपल्या मनगटातील ताकादीचे पाणी भल्याभल्यांना पाजून पराभवाची धूळ चारणारा गोकुळ आवारे ही सख्या भावाची जोडी देखील आपल्या कर्तुत्वाने लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यशाची हवा डोक्यात शिरली नसल्याने आजही मातीशी इमान राखणाऱ्या दोन्ही बंधुचे पाय जमीनीवर आहेत.

तसे पाहिले तर कुस्ती क्षेत्रात सुध्दा भावाभावांच्या जोड्या चांगल्याच गाजल्या आहेत. नव्वदच्या दशकात महाराष्ट्र केसरी संजय दादा पाटील आणि महाराष्ट्र चँम्पियन धनाजी पाटील (काका) ही आटकेची जोडी मैदानात होती. महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख आणि महिबुब शेख हे सोलापूरातील सख्खे भाऊ प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत उभे राहिले. तसेच सोलापूरच्याच सचिन खुर्द आणि नितीन खुर्द या सख्या भावांनी देखील मैदाने गाजवली.सातारच्या राजेंद्र सूळ, संजय सूळ आणि प्रदीप सूळ या सख्या भावांनी देखील आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्याच पंक्तीत आज बीड जिल्ह्यातील पाटोद्याचे राहुल आवारे आणि गोकुळ आवारे हे बंधू विराजमान झाले आहेत.

राहुल आवारे आणि गोकुळ आवारे हे बाळासाहेब आवारे यांचे सुपुत्र घरच्या आखाड्यात वडीलांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे प्राथमिक ज्ञान घेतल्यानंतर आयुष्य घडवण्यासाठी रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिंराजदार यांच्याकडे आले. सामान्य कुटुंबातून आलेल्या दोघा भावांना परस्थितीची पक्की जाणीव होती. कुस्ती क्षेत्रात उभे राहण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीबरोबर संघर्ष त्यांना करावा लागला. मात्र गुरु बिराजदार मामांनी या दोन बंधुच्या आयुष्याला आकार देण्याचे काम केले.त्यामुळे यशाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊनही दोघांना देखील आपल्या गुरु बद्दल प्रचंड आदर आणि नितांत श्रद्धा आहे. राहुल आणि गोकुळ दोघेही कुस्तीक्षेत्रात कारकीर्द घडवीत असले तरी दोघांचे ध्येय मात्र निरनिराळे आहे. थोरला राहुलने योग्य टप्यावर गुरुंनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे जाण्यासाठी गादीची कास धरली तर धाकट्या गोकुळने मैदानी कुस्तीत अव्वल स्थान मिळवले आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अगदी जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक मिळवून कुस्तीशौकिनांच्या गळ्यातील ताईत आणि तरुण मल्लांचा आयडाँल ठरलेल्या राहुलचे नाव सर्वपरिचित आहे. आज कुस्ती क्षेत्रात आवारे नाव घेतले कि सर्वांच्या डोळ्यासमोर चटकन राहुल आवारे नाव उभे राहते. परंतु राहुलचे नाव मोठे करण्यासाठी लहान भाऊ गोकूळचा देखील त्याग आणि मोलाचा वाटा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भावाच्या कर्तृत्वाची पताका उंच फडकत रहावी याकरिता पडद्याच्या मागे राहून ती पताका भक्कमपणे धरून उभ्या राहिलेल्या गोकुळचे हात कुणाला आजपर्यंत दिसले नाहीत. परंतु आजही तो भक्कमपणे नानाच्या मागे भाऊ म्हणून उभा आहे. 2016 च्या आँलम्पिक स्पर्धेत दुदैवाने राहुलचे तिकीट कापले गेले त्यावेळी न्याय मिळवण्यासाठी पडद्यावर राहुल लढत असला तरी पडद्याच्या मागे उभ्या असलेल्या गोकुळची तगमग कुणी पाहिली नाही. लहान असूनही भावाला न्याय मिळावा यासाठी त्याने अनेकांचे उंबरठे झिजवले आहेत. आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या भावाच्या लोकप्रियतेचा गैरफायदा कधीच त्याने घेतला नाही. आजही मैदानात आपली वेगळी प्रतिमा उभी करण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू आहे. राहुलच्या प्रसिध्दीच्या लोकप्रयितेमुळे गोकूळची कारकीर्द झाकोळली असली तरी स्वताची पारदर्शी प्रतिमा उभी करण्यासाठी तो मैदानात नेटाने लढतो आहे. अपयशाने पाठ सोडली नसली तरी देखील महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळवण्यासाठी तो मैदानात पाय रोवून उभा आहे. आज महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात अव्वल दर्जाचा मल्ल म्हणून त्याची ख्याती आहे.

गेली दहा वर्षे कुस्तीच्या आखाड्यात गोकूळचा सुरू असलेला संघर्ष मी जवळून पहात आलोय. बीड जिल्ह्याचे माती विभागातून त्याने प्रतिनिधित्व केले आहे. शिडशिडीत बांधा आणि मजबूत देहयष्टी असलेला गोकुळ वरवर शांत दिसत असला तरी मैदानात उतरला कि त्याच्याशी डावपेच लढताना अनेकांची भंबेरी उडाली आहे. प्रतिस्पर्धी मल्ल किती बलाढ्य ताकदीचा आहे याची पर्वा त्याने कधीच केली नाही. उलट तुफानी ताकदीच्या अनेक तगड्या मल्लासमोर पाय रोवून उभा राहून त्याने आपल्या लढवैय्या व्रुत्तीने पराभवाचे विजयात रुपांतर केले आहे. प्रतिस्पर्धी मल्लांना त्याच्यातील लांब पल्ल्याच्या दमाचा अंदाज अद्याप लागलेला नाही. अनेक अटीतटीच्या लढतीत समोर लढणाऱ्या मल्लाला तो दमवून काढतो भुगावच्या अधिवेशनात उपांत्य फेरीतील किरण भगत आणि गोकुळ मधील अटीतटीची आणि चुरशीची लढत ज्यांनी पाहिली आहे त्यांना गोकूळच्या ताकदीचा दमाचा अंदाज आला होता. दररोज एकाच तालमित सराव करणारे किरण आणि गोकुळ समोरासमोर उभे ठाकले होते. ही कुस्ती काही क्षणात होइल असा अनेकांचा अंदाज होता मात्र प्रत्यक्ष लढत पाहताना तो अंदाज साफ चुकला गुणांचा तक्ता वर खाली होताना विजयासाठी चुरशीची झुंज सुरू होती अंतिम क्षणी किरण विजयी झाला तरी देखील विजयाचा टप्पा गाठण्यासाठी त्याला बरीचशी ताकद या लढतीत खर्च करावी लागली होती. त्यामुळे माती विभागातील अंतिम फेरीत विजय चौधरी बरोबर लढताना त्याला तगडी झुंज देण्यात किरण अपयशी ठरला होता. मात्र मैदानातील कुस्ती शौकिनांनी गोकूळबरोबर झालेल्या लढतीत किरणची झालेली दमछाक त्याला अंतिम फेरीत महागात पडल्याची चर्चा सुरू होती. गुरू अर्जुनवीर काका पवार यांनी देखील प्रेक्षक गँलरीतून ही अटीतटीची झुंज पाहीली होती. शांतपणे प्रतिस्पर्धी मल्लाच्या भात्यातील एक एक डावाचे अस्त्र निकामे करून अनेक दिमाखदार विजय त्याने साकारले आहेत. मल्लसम्राट केसरी , मुंबई महापौर केसरी आदी प्रतिष्ठेच्या गदेची कमाई गोकुळने केली आहे. रामाप्रामाणे मोठा भाऊ राहुल कर्तुत्वाने यशाच्या शिखरावर आहे तर धाकटा लखन दुखापतीला तोंड देऊन महाराष्ट्र केसरीची गदा मिळवण्यासाठी झुंजतो आहे. यशाला गवसणी घालण्यासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या गोकुळचा आज वाढदिवस आहे.

त्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

फिरोज मुलाणी पत्रकार, 9860105786 / 9421120356


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!