
गंभीर बनून जगू नका. हे विश्व करोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि जग गाजवून गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही. या जगात आपले काहीच नसते, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करु नका. मी अमूक, मी तमूक असा अंहकार बाळगू नका. सर्वांशी प्रेमाने रहा.
धर्म, जात, पंथ, वंश या गोष्टी माणसाने निर्माण केल्या. त्यामध्ये अडकून पडू नका. स्वतःचा भरवसा नसतांना इतरांना संपवण्याची भाषा बोलू नका. इतिहासातील कुरापती काढून वर्तमान खराब करु नका. त्यांचे जीवन ते जगले तुम्ही तुमचे जीवन जगा व इतरांना जगू द्या.
आता काळानुसार बदला. बदला घेण्याच्या फंद्यात पडू नका. आपली खरी गरज काय आहे. उगीच फालतू गोष्टीत नाक खुपसू नका. हजारों प्रकारचे संकट घोंघावत असतांना, शुल्लक गोष्टींने विचलित होऊ नका. जीवन गंमतीने जगा. जरा मोकळेपणाने हसा. इतरांनाही आनंदी करा. लक्षात ठेवा तुमच्या गंभीरपणाने कुणाचेही भले होणार नाही. साऱ्या जगाचा विचार करू नका. नसती चिंता करु नका.
लहान सहान गोष्टींचा आनंद घ्या. सतत गंभीर बनू नका. इतरांशी मोकळेपणाने बोला. त्यामध्ये कमीपणा मानू नका. तुम्ही स्वतःला काहीही समजले तरी निसर्गाच्या पुढे तुम्ही फक्त एक जीव आहात. कुणाचाही द्वेष करु नका. सूडबुद्धीने वागू नका. आपल्या अवतीभोवतीचे जग बघा. किती गंमत आहे चोहीकडे. मुंग्याची रांग बघा. पाखरांचे थवे बघा. बघा कावळ्याची स्वच्छता.
खळखळणारा समुद्र तुमच्या सोबतीला आहे. त्याच्या उसळणाऱ्या लाटा तुम्हाला खुणावत आहेत. जा उंच डोंगरावर किती प्रेमाणे तो डोंगर खांद्यावर खेळवतो. विचारा त्या कोकीळेला, इतकी सुंदर कशी गातेस ?
विविध रंगाची फूले बघा. आयुष्यात विविध रंग भरा. एकसारखे जीवन जगू नका.
नवी ठिकाणे नवी माणसे यांच्याशी मैत्री करा. प्राण्यांशी संपर्क ठेवा, त्यांचे जगणे बघा. कटकटी कमी करा. अधिक आनंदी जगा.